IPL 2021: यंदाच्या आयपीएलमध्ये 'या' पाच खेळाडूंवर असणार सर्वांची नजर
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 वा मोसम 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जाईल. या लीगने भारतीय क्रिकेट संघाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. 2021 टी -20 विश्वचषकापूर्वी भारतीय फलंदाजांना आयपीएल 2021 मध्ये स्वत: ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. यावर्षी कोणत्या पाच फलंदाजांवर सर्वांची नंजर असणार आहे, पाहुयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईशान किशन... ईशान किशनने आयपीएलच्या गेल्या मोसमात 14 सामन्यात 145.76 च्या स्ट्राइक रेट आणि 57.33 च्या सरासरीने 516 धावा केल्या. या शिवाय किशननेही डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याला भारताच्या टी -20 संघात मध्ये स्थान मिळालं. आता किशनला आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरीनंतर 2021 टी -20 वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळवायचे आहे.
ऋषभ पंत.... ऋषभ पंत सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. ऋषभ पंतने 2017 मध्ये टी -20 आणि 2018 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. मात्र, गेल्या एक वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या संघात निवड झाली. आता त्याची स्पर्धा इशान किशन याच्याशी आहे. अशा परिस्थितीत पंतला जर 2021 टी -20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला आयपीएल 2021 मध्ये आपला सध्याचा फॉर्म कायम ठेवावा लागेल. आयपीएलच्या शेवटच्या सत्रात तो केवळ 343 धावा करू शकला. पण सद्यस्थितीकडे पाहता यावेळी तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. आयपीएल 2018 आणि 2019 मध्ये पंतने अनुक्रमे 684 आणि 488 धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाड.... चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2020 च्या सहा सामन्यांमध्ये 200 हून अधिक धावा करून आपली प्रतिभा जगासमोर आणली होती. त्याची प्रतिभा पाहता असा विश्वास आहे की तो या मोसमात सर्व सामन्यात ओपनिंग करेल. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे लक्ष त्याच्या कामगिरीवर असेल.
सूर्यकुमार यादव.... गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा विश्वासार्ह फलंदाज सूर्यकुमार यादव हा संघाच्या फलंदाजीचा मुख्य दुवा आहे. सर्यकुमारने आयपीएलच्या शेवटच्या सत्रात 480 धावा केल्या होत्या. तसेच सूर्यकुमारने आयपीएल 2019 आणि 2018 मध्ये 424 आणि 512 धावा केल्या होत्या. त्याची कामगिरी पाहता इंग्लंडविरुद्धच्या टी -20 आणि एकदिवसीय मालिकेत त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. त्याला तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने चांगली कामगिरी केली. आता त्याला 2021 टी -20 विश्वचषक संघात स्थान मिळवायचे असेल तर आयपीएल 2021 मध्ये त्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल.
शिखर धवन.... धीम्या फलंदाजीमुळे शिखर धवनला आता भारताच्या टी -20 संघात संधी कमी मिळत आहे. मात्र तरीही आयपीएल 2020 धवनसाठी एक शानदार सीजन ठरला. मागील मोसमातील 17 सामन्यात त्याने 618 धावा केल्या. 2021 वर्ल्ड कप संघात पुन्हा एकदा फलंदाजी करून धवनला आपलं स्थान निश्चित करायचं आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कामगिरीवर अनेकांचं लक्ष राहील.