In Pics : टी20 इतिहासातील एक तगडा विजय, 168 धावांनी सामना जिंकत मालिकाही भारतानं 2-1 ने जिंकली
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर तगडा विजय मिळवत मालिका जिंकली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं सामन्यात आधी स्फोटक फलंदाजी आणि नंतर दमदार गोलंदाजी करत सामना 168 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
मालिकेतील पहिला सामना जरी भारतानं गमावला असला तरी दुसरा सामना 6 विकेट्सनी आणि आजचा सामना जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं 235 धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं.
यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 63 चेंडूत 126 धावा केल्या.
ज्यानंतर गोलंदाजी कर्णधार हार्दिकनं 4 विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला 66 धावांत सर्वबाद करत सामना 168 धावांनी जिंकला.
सर्वात आधी म्हणजे सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खास झाली नाही, सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन स्वस्तात तंबूत परतला.
मग गिलसोबत राहुल त्रिपाठीनं स्फोटक खेळी केली. 44 धावा करुन राहुल तंबूत परतला. मग सूर्यकुमारही 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॅप्टन पांड्यानं गिलसोबत डाव सावरला. पांड्या 30 धावा करुन बाद झाला पण तोवर गिलनं तुफान फटकेबाजी करत 54 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्याने सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 126 धावा केल्या. हुडानं 2 धावांचं योगदान देत भारताची धावसंख्या 234 पर्यंत नेली.
120 चेंडूत 235 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीपासून भारतीय संघानं धक्के देण्यास सुरुवात केली. आजची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्यानं भारतीय पेसर्सनी तशीच कामगिरी करत अवघ्या 66 धावांत किवी संघाला सर्वबाद केलं.
यावेळी सर्वोत्कृष्ट गोलदांजी कॅप्टन हार्दिकनं केली. त्यानं 4 षटकांत 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलनं 35 धावांची झुंज दिली पण भारताने दिलेल्या विशाल लक्ष्यासमोर ही धावसंख्या फार कमी असल्याने सामना भारताने 168 धावांच्या तगड्या फरकाने जिंकला. दोन तगड्या संघामध्ये झालेल्या टी20 सामन्यातील हा सर्वात मोठा विजय आहे.