IND vs BAN : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव, मालिकेत बांगलादेशची 1-0 ची आघाडी
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने अवघ्या एका विकेटने विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी गोलंदाजी करत बांगलादेशनं अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं. त्यानंतर 46 ओव्हरमध्ये 9 गडी गमावत 187 धावा करत सामना जिंकला.
136 धावांवर बांगलादेशचे 9 गडी बाद झाले असताना सामना ते जिंकतील असं वाटत होतं, पण तेव्हाच मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला.
बांगलादेशचे 9 विकेट गेले असताना मॅचविनर मेहदीचा झेल भारताच्या केएल राहुलनं सोडला आणि हेच भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.
नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली. सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले.
विराटही 9 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस आणि केएल यांनी डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला.
केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या 73 धावांच्या जोरावर भारत 186 धावांपर्यंत पोहचू शकला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या.
बांगलादेशकडून स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसन याने महत्त्वपूर्ण असे 5 विकेट्स घेत कमाल गोलंदाजी केली. ए. हुसेन यानेही तब्बल 4 विकेट्स घेतले, तर मेहिदी मिराजने एक गडी बाद केला.
187 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशने संयमी खेळ करत विजय मिळवला. कर्णधार लिटन दासनं सर्वाधिक 41 धावा केल्या असल्या तरी मेहदीचे नाबाद 38 रन महत्त्वाचे ठरले. 136 धावांवर बांगलादेशचे 9 गडी तंबूत परतले असताना मेहदी हसननं मुस्तफिजूरसोबत अर्धशतकी भागिदारी करत सामना बांगलादेशला जिंकवून दिला.
बांगलादेशनं मिळवलेल्या या विजयामुळं मालिकेतही त्यांनी 1-0 ने आघाडी घेतली आहे.