In Pics : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय, अवघ्या एका रनने जिंकला सामना
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील एक अप्रतिम लढत पाहायला मिळाली. ज्यात न्यूझीलंडनं एक रोमहर्षक विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघ्या एका रनच्या फरकानं सामना जिंकत न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेटमध्ये किती चुरस आहे, ते दाखवून दिलं.
सर्वात आधी फॉलोऑन मिळूनही 258 धावाचं तगडं लक्ष्य किवी संघानं इंग्लंडला दिलं. ज्यानंतर अवघ्या एका धावेच्या फरकाने सामना जिंकून न्यूझीलंडने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.
फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड हा तिसराच जगातील संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड आणि भारताने ही कामगिरी केली आहे.
सामन्यात आधी इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा करुन किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची विशाल आघाडी घेतली.
ज्यानंतर न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य दिलं.
शेवटच्या डावात इंग्लंडला 256 धावांवर सर्वबाद करत न्यूझीलंडने सामना जिंकला. नील वॅगेनरने अखेरची विकेट घेत विजयात मोलाची कामगिरी बजावली.
या विजयामुळे दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेलिंग्टन कसोटीची खास गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने फॉलऑन खेळूनही इंग्लंडला पराभूत केलं.
पहिल्या डावात नाबाद 153 धावांची खेळी करणाऱ्या जो रुटने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याने कर्णधार बेन स्टोक्ससोबत सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने 95 धावा केल्या.
एकवेळ अशी होती की इंग्लंडचा संघ दुसरी कसोटी सहज जिंकेल असे वाटत होते. पण वॅगनरने जो रुट आणि बेन स्टोक्सला बाद करुन न्यूझीलंडला विजयाजवळ नेलं. यानंतर बेन फॉक्सला टीम साऊदीने बाद केलं. यानंतर स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच यांनी न्यूझीलंडकडून सामना हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघेही बाद झाले. शेवटच्या क्षणांमध्ये जेम्स अँडरसनने चौकार मारुन न्यूझीलंडच्या हृदयाची धडधड वाढवली होती. पण विजयासाठी अजून एक धाव बाकी असताना वॅगनरने अँडरसनला बाद करत आपल्या संघाला एका धावेच्या फरकाने विजय मिळवून दिला.