International Tea Day 2022 : ...यासाठी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन!
भारतीयांसाठी चहा हे केवळ एक पेय नाही तर जीवनाचा अतूट भागच आहे. बहुसंख्य भारतीयांची सकाळ ही चहाने सुरु होते. आज जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो.
आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे.
चीन, भारत, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. याव्यतिरिक्त टांझानिया, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते.
चहा जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाण्याऱ्या पदार्थापैकी एक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची चहा बनवण्याची पध्दत वेगळी असते. कुणाला आलं घालून चहा प्यायला आवडतं तर कुणाला ब्लॅक टी प्यायला आवडते.
म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागात 1824 सालच्या दरम्यान चहाचे पानं सापडली. त्यानंतर इंग्रजांनी 1836 सालापासून चहाचे उत्पादन सुरु केलं.
भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केलं जायचं. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिध्द आहे.
चीन हा जगातील सर्वात मोठा चहाचा निर्यातक आहे. भारतातही चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं पण स्थानिक स्तरावर त्याचं सेवनही मोठ्या प्रमाणात केलं जातं. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं.
चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक अॅसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन (कॅफिन, थिओफिलाइन आणि थियोब्रोमाइन) हे घटक असतात. हे शरीराला फायदेशीर असतात. चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरात शक्तिशाली अॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.