Shrimant Dagadusheth ganpati Temple : कशी असेल यंदाच्या गणशोत्सवात दगडूशेठ गणपतीची सजावट?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Dagadusheth Temple) ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे.
पुढील वर्षी सन 2024मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे.
गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे.
यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे.
तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये 24 खांब आणि 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत.
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे.