तळी, भंडाऱ्याची उधळण, अलोट गर्दी; जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह, खंडेरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्याती भक्तांची रिघ
Khandoba Somvati Amavasya Yatra: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे, तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजता खंडोबा देवाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी गडावरून प्रस्थान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. आज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाले आहेत.
भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे.
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा यंदा आज 13 नोव्हेंबरला भरणार आहे. सकाळी 7 च्या सुमारास खंडोबा गडावरुन हा पालखी सोहळा सुरू होणार आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या सुमारास खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीचं कर्हा नदीवर स्नान सोहळा संपन्न होणार आहे.
सोमवती यात्रेसाठी राज्यभरातून जेजुरी गडावर अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सोमवती यात्रेच्या नियोजनाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खांदेकरांना विशिष्ट ड्रेसकोड देण्यात आला आहे. तसेच, पालखी सोहळ्यातील भाविकांना चहा,पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोमवती यात्रेनिमित्त वाहतुकीतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जेजुरीत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त (दि. 13) वाहतूक बदल करण्यात आला आहे.
वाहन चालकांनी 13 नोव्हेंबर पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.