जलजीवन मिशनची ऐशीतैशी; पाण्यासाठी घरदार विहिरीवर, संताप ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
मराठावाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागिरकांच्या घशाला कोरड असल्याचेच चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी जिल्ह्याच्या पुर्णा तालुक्यातील कमलापूरवासी तहानलेलेच असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या गावात जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने गावची तहान एका बोअर अन विहिरीवर अवलंबून आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे विहिर व बोअरचेही पाणी आटले आहे.
पाण्याचा पुरवठा नसल्याने, पिण्यासाठीही पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावरच मोर्चा काढल्याचे दिसून आले.
अगोदरच पाणी नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मात्र, ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनांचं काम अर्धवट राहिल्याने तिथल्या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
परभणीच्या कमलापूरवासीयांचे असेच हाल झाले असून यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढलाय. पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम झाले. मात्र, हे काम अर्धवट सोडून कंत्राटदार पसार झाल्याने गावकऱ्यांना गावातील केवळ एका बोर आणि एका विहिरीवर पाणी भरावं लागत आहे.
अंदाजे 1500 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना दिवसभर रांगा लावून याच पाण्याच्या फंद्यामध्ये अडकून बसावे लागत आहे. त्यामुळे, संतापलेल्या गावकऱ्यांनी आज हे काम पूर्ण करून पाणी देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढला.
राज्य सरकारने मिशन जलजीवनअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू केली आहे. तर, हर घर जल योजनेंतर्गत गावागावात नळ कनेक्शनद्वारे पाणी पोहोचणार आहे. मात्र, अद्यापही बहुतांश गावात पाण्याची समस्या गंभीर आहे.