पनवेल मधील 300 वर्ष जुना बापटवाडा जमिनदोस्त, धोकादायक असल्यामुळे महापालिकेची कारवाई
पनवेल शहरातील ऐतिहासिक वाडे हीदेखील शहराची एक ओळख आहे. कालांतराने या वाड्यांची जागा टोलेजंग इमारती घेत आहेत. यापैकीच एक पेशवेकालीन बापटवाडा पालिकेने जमीनदोस्त केला, धोकादायक असल्याने पालिकेने पोलिसांच्या फौजफाट्यासह जमीनदोस्त केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेशवेकालीन हा वाडा चिमाजी आप्पायांनी वसईच्या स्वारीवेळी पनवेल मध्ये बांधला होता. या वाड्याला जवळपास 300 वर्ष झाली.
शहरातील ऐतिहासिक गोकुळाष्टमीचा सण या वाड्यात कित्येक वर्षांपासून साजरा होत होता. सध्याच्या घडीला या वाड्यात 12 भाडेकरू वास्तव्यास होते. मात्र हा वाडा धोकादायक झाल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी भाडेकरूंना नोटिसा बजावून घरे खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या.
तलावांचे शहरासोबत वाड्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल गावात पेशवेकालीन इतिहासाच्या खूना आजही आहेत. शहर होण्यापुर्वी गाव असलेल्या पनवेल शहरात अनेक वाडे होते. विकासाच्या लाटेत हे वाडे जमिनदोस्त होऊन भौगोलिक विस्तारासाठी जमिन अपुरी पडू लागल्यानंतर वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली.
परंतू 300 वर्षे जुना असलेल्या पनवेल शहरातील बापटवाड्याची पडझड होवूनही इतिहासाची साक्ष देत उभा होता. दगडमातीचे बांधकाम असलेल्या बापटवाड्यात एकेकाळी एकावेळी शंभर ते सव्वाशे कुटूंब रहात होती.
पनवेल शहरात 150 वर्षे जुना धुतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधे बनविणारा कारखाना होता. तसेच जुनी नगरपालिका यामुळे अनेक कामगारांना भाडेतत्वावर राहण्याची हक्काची जागा म्हणजे बापटवाडा होता. म्हणूनच पनवेलमध्ये रहायला बापटवाडा आणि कामाला धुतपापेश्वर अशी म्हण देखील प्रचलित झाली होती.
इंग्रजकालीन तहसिल कचेरी देखील बापटवाड्याला लागून होती. कुटूंबियांच्या चार वारसदारांपैकी दोन वारसदारांनी त्यांच्या वाट्याला आलेला बापटवाडा यापुर्वी विकसकांना विकून मोडीत काढला होता.
उरलेल्या जागेत दोन वारसदार आणि भाडोत्र्यांमध्ये वाद सुरू होते. पुर्वीच्या अत्यंत नाममात्र भाडेतत्वावर अनेक वर्षांपासून दोन भाडोत्री इथे रहायला होते. वाड्याची देखभाल दुरूस्ती करण्यात मालकाची इच्छा नसल्यामुळे अनेक भाडोत्र्यांनी बोजाबिस्तारा गुंडाळून आपले बिर्हाड इतरत्र हलविले होते.
अनेक वर्षांपासून भाडोत्री आणि मालक यांच्यातील वाद न्यायालयात होता. न्यायालयाने धोकादायक झालेला उरलासुरला वाडा पाडण्यास परवानगी दिल्यामुळे महापालिकेने वाडा पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. कारवाईपुर्वी वाड्यात राहणाऱ्या दोन भाडोत्र्यांना नोटीस देखील दिली होती. वाडा पुर्णपणे रिकामा केल्यामुळे महानगरपालिकेने धोकादायक वाडा जमिनदोस्त केला.
दरम्यान, पनवेल मधील परंपरागत गोकूळकाला याच बापटवाड्यात दरवर्षी व्हायचा. जिकी वर्ष या वाड्याला झाली आहे, साधारण तितकीच वर्षे बापटवाड्यात सुरू झालेल्या आगळ्या वेगळ्या गोपालकाला उत्सवाला झाली. काही दिवसांपुर्वी साजरा झालेला गोपालकाला उत्सव देखील वाड्यात साजरा झाला होता. आता हा उत्सव कुठे साजरा होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.