In Pics : मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' अधिक; विधानभवनाबाहेरील कटआऊटमुळे रंगल्या चर्चा
विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं कटआऊट लावण्यात आलं आहे. या कटआऊटमुळे विधानभवन परिसरात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. कारण या कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कटआऊट तुलनेने कमी उंचीचा तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कटआऊट जास्त उंचीचा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कटआऊटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटचा आकार लहान आहे, मात्र त्याला बेस आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटला सपोर्ट आणि उंची देण्यासाठी काही बांबू जोडण्यात आले आहेत. हा कटआऊट प्रशासनाकडून लावण्यात आला आहे की स्थानिक कार्यकर्त्यांकडून याची माहिती नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआऊटच्या खाली श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांची नावे आहेत. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत तर किरण पांडव हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. या कटआऊटला महापालिकेला परवानगी आहे का याची माहिती द्यायला पालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.
या दोन्ही कटआऊटमध्ये प्रथमदर्शनी उपमुख्यमंत्र्यांची उंची मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक असल्याचं दिसतं. त्यामुळेच दिवसभर विधानभवन परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कटआऊटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्याही प्रतिमा आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटआऊटमध्ये अन्य कुणाची प्रतिमा नसल्याने त्या कटआऊटचा आकार मोठा झाला आहे.
विधानभवनात आमदार आणि मंत्र्यांसह वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येणारी वाहने येथेच थांबत असल्याने साहजिकच प्रत्येकाची नजर या कटआऊटवर पडते.. आणि पाहणारे वेगवेगळ्या अंगाने त्याची चर्चा करतात.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३० जून रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तत्पूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत, आपण शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, तसंच एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील असं त्यांनीच जाहीर केलं होतं. त्यानंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील असं भाजप पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलं होतं. त्यावेळीही अशाच चर्चा रंगल्या होत्या.
विधान भवनात आलेल्या अनेकांनी या कटआऊटच्या लहानमोठ्या आकाराबद्दलची चर्चा करत आपापल्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि ते फॉरवर्ड ही केले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या या कटआऊट्सचे फोटो राज्यभरात व्हायरल झाले.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या कटआऊटविषयी आपापल्या संदर्भाने चर्चा करण्यात आणि वेगवेगळे अर्थ काढत चर्चा रंगवली. प्रत्येकजण आपापल्या सोईने अर्थ काढत त्याखाली कॅप्शन टाकत होतं.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कटआऊटवर विरोधी पक्षातील नेत्यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियावर चांगलेच तोंडसुख घेतले.
कटआऊट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या कटआऊटपेक्षा देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट मोठा असल्याचं दिसतेय.
या कटआऊटच्या आकाराची चर्चा दिवसभर नागपूर आणि सोशल मीडियावरही रंगली होती.