Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : शिवकालीन इतिहासाचा वसा जपणारा अवलिया, घरातच निर्माण केलं अनोख ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय!
अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj). महाराजांनी मावळ्यांसोबत घडवलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्यासोबतच आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. शिवराज्यभिषेकाच्या दिवशी या चलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. देवनागरी लिपीत लिहिलेले नाणे समस्त महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक बनले. तेव्हाच स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे 'शिवराई' हे नाणं स्वराज्याला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, ती नाणी जमवण्याची आवड जोपासलेले काही मोजकेच असतात. त्यापैकी एक म्हणजे राजा जाधव (Raja Jadhav). जाधव यांनी जीवनातील प्रवासात विभिन्न प्रकारची अनेक नाणी जमवली. त्यातूनच त्यांची नाण्यांपोटी गोडीही वाढत गेली आणि त्यांच्याकडे 'नाणींसंग्रह' तयार झाला. त्या नाण्यांतील विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेली शिवकालीन 'शिवराई' ही नाणी.
राजा जाधव यांना रिझर्व्ह बँकेत कामाला असताना फिरावे लागत असे. साल 1982-83ला गंगोत्रीला गेले असताना लहान, मोठ्या आकाराची विविध भाषेची नाणी विकायला ठेवलेली त्यांना दिसली. ती नाणी ही शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचं त्यांना समजलं. तिथेच देवनागरी शब्द असलेल्या नाण्यांवर त्यांचे लक्ष गेले, तेव्हा ती शिवकालीन नाणी असल्याचं त्यांना समजलं आणि ती सर्व नाणी त्यांनी विकत घेतली.
तेव्हापासून जाधव यांचा नाणीसंग्रह करण्याचा प्रवास आजही सुरू आहे. आज त्यांच्याकडे विविध प्रकारची नाणी असली तरी 'शिवराई' नाणी ही त्यांच्यासाठी खास असल्याचं जाधव सांगतात. शिवकाळातला सोन्याचा 'होन' मिळणे दुर्लभ असले, तरी ताब्यांची शिवराई मात्र अजूनही गड-किल्यांवर किंवा जुन्या शिवकालीन वाड्यांमध्ये, मंदिरात आढळून येत असल्याचं जाधव सांगतात.
महाराजांनी एखादा गड काबीज केल्यास आनंदोत्सवात नाणी उधळली जायची. ती नाणी काहींना मिळत, तर काही अद्यापही कडेकपाऱ्यात किंवा झाडांझुडपात अडकून पडलेली आहेत. पावसाळ्यात गडावरून येणारे पाणी ही नाणी पायथ्यांशी असलेल्या गावातील नदीत बरेचदा वाहत येतात. ती नाणी गोळा करण्याचं काम गावात राहणारे झाडकरी करत असतात. अशा झाडकऱ्यांकडून आपण अनेक शिवकालीन नाणी जमा केली आहेत, असे ते सांगतात.
जाधवांकडे 3 हजार शिवराई नाणी आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, अशी चित्र काढलेली आहेत. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारात असलेल्या शिवराईपैकी मोठ्या शिवराईचे वजन हे 8 ग्रॅम, तर लहान शिवराईचे वजन 4 ग्रॅम असतं.
या विविध परिमाणांच्या शिवराईंचे अक्षर वळण साधारणतः सारखेच असून, त्या वरील लेख हा पुढील बाजूने तीन ओळींत 'श्री /राजा/ शिव' आणि मागील बाजूला 'छत्र/ पति' असा असल्याचे आढळून येते. तर 'श्री/राजा/शिव,छत्र/पति' या मजकुरा व्यतिरिक्त पुढील बाजूला 'श्री /राजा/शीव', 'श्री /राजा /सिव', 'श्री /राजा/ सीव' असलेल्या शिवराईदेखील सापडतात. अशी 152 विविध प्रकारची शिवराई होती, असं जाधव सांगतात.
जाधवांच्या नाणी संग्रहाचा छंद अद्यापही सुरू आहे. त्यांच्याकडे जवळजवळ पंधरा हजाराहून अधिक नाणी आहेत. अत्यंत दुर्मिळात दुर्मिळ अशी नाणी असून त्यात अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजान, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, राणी एलिझाबेथ, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी विशिष्ट नाणी वापरली जात तीही नाणी जाधव यांच्याकडे आहेत. तसेच, त्याव्यतिरिक्तही जुन्या नोटा, दुर्मिळ पुस्तकं, द्वितीय महायुद्धातील वृत्तपत्रातील मथळे असे अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज त्यांच्या नालासोपारा येथील राहत्या घरातील छोटेखानी संग्रहालयात आहेत.