Nawab Malik: मलिक तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष
दोन महिन्यांच्या जामिनावर नवाब मलिक बाहेर आले आहेत, प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मलिकांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना चार दिवसांआधी जामीन मंजूर झाला आहे. याआधी सुप्रिया सुळेंनी मलिकांची भेट घेतल्यानंतर आता अजित पवार गटानेही भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते आता कोणत्या गटात सामील होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. परंतु येत्या काळात मलिकांची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राष्ट्रवादीत फूट पडली असल्याने नवाब मलिक कोणत्या गटात जातात, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच आज (15 ऑगस्ट) अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी ते जवळपास दीड वर्षांनंतर घरी परतले.
मलिकांना पेढा भरवून प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.
या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांना दिली आहे.
नवाब मलिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता आम्ही त्यांची भेट घेतली असल्याचं पटेल म्हणाले.
सोळा महिन्यानंतर वैद्यकीय कारणाने दोन महिन्यांचा जामीन त्यांना मिळाला आहे. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना उपचारांची गरज असल्याचं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
मलिक आमचे सहकारी आहेत. 20 ते 25 वर्षे आम्ही एकत्र काम केलं आहे. अशा परिस्थितीत आमच्या मित्राची भेट घेणं स्वाभाविक असल्याचं पटेल म्हणाले.
नवाब मलिक बारीक झाले आहेत, त्यांचं वजन कमी झालं आहे आणि त्यामळे माणुसकी म्हणून मित्राला भेटायला गेलो आणि या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
नवाबभाईंची प्रकृती सुधारणं महत्त्वाचं आहे. त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय त्यांना राजकारणात आणू नये, असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
ही केवळ सदिच्छा भेट होती, राजकीय भेट नव्हती. दुसरा कुठलाही अर्थ काढू नका, असं आवाहन देखील पटेलांनी केलं आहे.