Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आता एकूण 39 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाचे अंदाजित वेळापत्रक पाहता पालिकेला हा पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
धरणांमधील पाणीसाठा वेगाने आटत गेल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने खबरदारी म्हणून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे.

मान्सूनचा पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला धरण आणि तलावांमधील राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागेल.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये सध्या एकूण 5 लाख 66 हजार 599 दशलक्ष लिटर पाणी आहे. ही धरणे एकूण 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याच्या क्षमतेची आहेत.
सध्याचा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त असला, तरी आगामी काळात पाणी पुरेसं राहील का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईला दररोज सरासरी 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध साठा कमी झाल्यास टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याची वेळ येऊ शकते.
पावसाळ्यापूर्वी पाणीकपात झाल्यास मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागेल. अनेक इमारतींना टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागू शकतो.