Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दिकींचा वांद्र्यातील बांधकाम लॉबीवर इतका दबदबा कसा? कसे बनले वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग? पाहा
बाबा सिद्दिकी हे राजकीय नेते म्हणून जेवढे लोकप्रिय होते तेवढीच मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्येही त्यांच्या नावाची चर्चा होती. विशेषतः वांद्र्यातील पाली हिल आणि खार परिसरात त्यांनी अनेक आलिशान गृहनिर्माण प्रकल्प उभारले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर वांद्रे परिसरातील दोन प्रमुख झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी लढा सुरू केला होता. त्यांच्या हत्येमागे एसआरए प्रकल्पातील वाद कारणीभूत आहे का, याचाही आता पोलिस तपास करत आहेत.
मुंबईतील राजकारणी आणि बांधकाम लॉबी यांच्यातील संबंध नेहमीच घट्ट असतात. सिद्दीकींच्या पदामुळे त्यांना महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पांवर प्रभाव टाकण्याची आणि विकसक आणि स्थानिक प्राधिकरणांमध्ये असलेल्या वादांना सोडवण्याची संधी मिळाली.
रिअल इस्टेट विकसकांना अनेक वेळा सिद्दिकींच्या संबंधांवर अवलंबून राहावं लागलं, ज्यामुळे परवानग्या आणि मंजुरी लवकर मिळवता आल्या. सिद्दिकी हे कायद्याच्या चौकटीला बाजूला ठेवून जमिनीच्या व्यवहारांमध्ये सामील होते, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
असा सुरु झाला होता प्रवास : 2003 मध्ये विकासक विनय मंदानी आणि कल्पना शहा यांच्याशी सिद्दिकी यांनी भागीदारीत 'व्हर्टिकल डेव्हलपर्स' या नावाने कंपनी सुरु केली होती. मात्र, एकाच वर्षात त्यांनी स्वतःच्या पत्नीशी भागीदारी करत 'झीअर्स डेव्हलपर्स' नावाने एक गृहनिर्माण कंपनी सुरु केली.
झीअर्स कंपनीच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांत त्यांनी वांद्र्यात विशेषतः पाली हिलसारख्या आलिशान परिसरात जवळपास 40 गृहनिर्माण प्रकल्प साकारले.
पाली हिल परिसरात अनेक बॉलिवूड कलाकार वास्तव्याला आहेत. त्यांच्या सर्कलमध्ये बाबा सिद्दिकी चांगलेच लोकप्रिय होते.
बांधकाम लॉबीवर दबदबा : काही बॉलिवूड कलाकार राहत असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे कामही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम केल्यानंतर त्यांच्या कंपनीचा परिसरात चांगलाच दबदबा आहे.
वांद्रे, पाली सारख्या परिसरात आजही अनेक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दोन झोपु प्रकल्पांना केला होता विरोध : वांद्रा येथील सध्या संत ज्ञानेश्वरनगर आणि बीकेसीमधील भारतनगर झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प चर्चेत आहेत. या प्रकल्पाला त्यांचा विरोध नव्हता; मात्र प्रकल्पातील लोकांना विश्वासात न घेतल्याचा, तसेच या प्रकरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रकल्पाला विरोध केला होता.
येथील साडेपाच हजार कुटुंबीयांचे पुनर्वसन केल्यानंतर तेथे आलिशान घरं, पंचतारांकित हॉटेल, कार्यालयीन इमारती उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पात अंदाजे 20 हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे. या प्रकल्पांचा विकास खासगी विकासकांमार्फत करण्याऐवजी म्हाडाच्यामार्फत करावा, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी देखील केली आहे.
संत ज्ञानेश्वरनगर प्रकल्प साकारला जाण्यासाठी ठाकरेंचे शिवसेना नेते अनिल परब यांनी पुढाकार घेतला आहे. लार्सन अँड टुब्रो आणि वेलोर इस्टेट (आधीची डीबी रिअॅलिटी, २ जी प्रकरणातील अडकलेल्या शाहिद बलवा यांची कंपनी) या कंपन्या हा प्रकल्प साकारण्याच्या तयारीत आहे. या सुमारे 10 एकर जागेचा विकास ते करणार आहेत.