Nagpur News : अनियोजित विकासकामामुळे नागरिकांची वाताहात; सुमारे 600 कुटुंबांचे घराबाहेर निघणेही झाले मुश्किल!
नागपूर महानगरपालिका आणि वाडी नगरपालिकेने ऍटोमिक एनर्जी डेपो रोड वर राहणाऱ्या सुमारे 600 कुटुंबांची अक्षरक्ष: कोंडी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने सिमेंट रोडचे काम सुरू केले आहे. तर दुसऱ्या कोपऱ्यावर नगरपरिषदेने नाल्यावरील पुलाचे बांधकाम केले आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या या अनियोजित कामाचा फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे.
या मार्गावर असलेल्या निवासी संकुल किंवा आंबेडकर वस्तीतील शेकडो नागरिकांना घरातून निघून वाडीच्या किंवा नागपूरच्या दिशेने जाणेही कठीण होऊन बसले आहे.
कहर म्हणजे कंत्राटदाराने ही या खोदकामाचा मलबा तसाच रस्त्याच्या मधोमध आडवा टाकल्याने पायी चालणे ही कठीण होऊन बसले आहे.
दुसरीकडे, या रस्त्यावर पावसात तुटलेलं झाड गेले अनेक दिवस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचललेलं नाही. त्यामुळे झाडाच्या तुटलेल्या फांद्याही शाळेची बस पकडण्यासाठी महामार्गापर्यंत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण वाढवत आहे.
या परिसरात ॲटॉमिक एनर्जी डेपो रोड वर बँक, व्यापारी संकुल, निवासी संकुल, रो हाऊसेस आणि आंबेडकर वस्ती वसलेली आहे. या मार्गाचा वापर पॉप्युलर सोसायटी आणि कमलानगरचे निवासी ही करतात. मात्र, गेले अनेक महिने या रस्त्याची दुरावस्था होऊन मोठ मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे.
या रस्त्याच्या आंबेडकर वस्तीकडील टोकावर ऐन पावसाळ्यात नगरपालिकेने पुलाच्या रुंदीकरणाचा काम काढलं असून बेजबाबदार कंत्राटदाराने गेले अनेक दिवस हे काम बंद ठेवल्याने तिथे प्रचंड चिखल आणि मोठे मोठे खड्डे पडल्याने महिलांसह शाळकरी मुलांची वाताहत होत आहे.
कंत्राटदाराचा रस्त्यावर पसरलेले बांधकाम साहित्य आणि इतर वस्तू इथल्या नागरिकांच्या अडचणी वाढवत आहेत.
नागरिकांनी खड्ड्यांची तक्रार करत नगरपालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली असता, खड्डे बुजवण्याच्या नावाखाली जाड गिट्टी आणून रस्त्यावर पसरवण्यात आली. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
ऐन पावसाळ्यात कोणतेही नियोजन न करता सुरू करण्यात आलेले काम, कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा, गेले अनेक महिने रस्त्याची झालेली दुरावस्था, मोठे मोठे खड्डे, शाळकरी मुलांची वाताहत या सर्व कारणांमुळे परिसरातील नागरिक सध्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.