Bharat Jodo: हजारो मशाली, छत्रपतींचा जयघोष अन् कार्यकर्त्यांचा जोश; महाराष्ट्रात 'भारत जोडो'चं दणक्यात स्वागत
हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्देश देश जोडण्याचा आहे.
देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील 14 दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करत आहे ही अभिमानाची बाब आहे.
देशात आज ज्वलंत समस्या आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. 400 रुपयांचा गॅस सिलेंडर 1100 रुपये झाला, पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झालं,पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
देगलूर येथील कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि विविध मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तेलंगणातील कामीरेड्डी येथून आलेल्या पदयात्रेचे देगलूरमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नांदेड परिसरातील सर्व रस्त्यांवरून लोक देगलूरकडे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जात होते.
देगलूर येथून राहुल गांधी गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी, वन्नाळी कडे पायी निघाले यावेळी जवळपास चार हजार मशालींसह हजारो भारतयात्री ही पदयात्रेने वन्नाळीपर्यंत गेले.