Ashadhi Wari 2023: विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार अन् वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ... पण तुमच्या गळ्यात चायना माळ तर नाही?
Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ... देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. गळ्यात तुळशीची माळ (Tulshimal) हीच वारकऱ्यांची (Pandharpur Wari 2023) ओळख असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही 108 मण्यांची तुळशीमाळ बनते. मात्र सध्या या भक्तीची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेपुढे चायना माळेचे आव्हान उभे ठाकले आहे. खरी तुळशीची माळ कशी ओळखावी? हे वारकरी संप्रदायापुढे मोठं आव्हान बनू पाहत आहे.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तुळशीमाळ म्हणजे, जगण्याचे अगाध तत्वज्ञान असते. याच भावनेतून जसे स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते, तसेच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेने होते. देवाला तुळस प्रिय... म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते.
पंढरपूरमध्ये ही माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो, म्हणून या माळेला इथे विशेष महत्व असते. अंगणात तुळशीची पूजा केली जाते, त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याच प्रमाणे तुळसीची माळ धारण केल्याने आरोग्याला फायदे तर होतात शिवाय भक्तांचे मन शुद्ध राहण्यास मदत होते, अशी भागवत धर्मात धारणा आहे.
वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही संबोधले जाते. या संप्रदायामध्ये तुळशीच्या 108 मण्यांची माळ घातल्या खेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. तुळशीची माळ घालणे म्हणजे, एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते.
पंढरपूरमध्ये शेकडो वर्षांपासून येथील काशीकापडी समाज तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आला आहे. तुळशीच्या लाकडाचे तुकडे राट नावाच्या यंत्रावर कातून त्यांचे मणी बनविण्याची कला या समाजातील लहान लहान मुलांनाही अवगत आहे. हा समाज वर्षभर तुळशीमाळ बनविण्याचा व्यवसाय करीत असतो.
पंढरपूरमध्ये चार मोठ्या यात्रां सोबत रोज येणाऱ्या भाविकांच्या देखील माळ घालण्याची संख्या मोठी असल्याने वर्षभर हा समाज माळा बनविण्याचे काम करीत असतो. पंढरपूर बरोबरच आळंदी, देहू, पैठण, मुक्ताईनगर अशा सर्वच संतांच्या गावात जाऊन हा समाज बनविलेल्या माळा विकायचे काम करीत असतो. मंदिर परिसरातील प्रत्येक लहान मोठ्या व्यापाऱ्याकडे या तुळशीच्यामाळा वर्षभर विकल्या जातात. आजही वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या खऱ्या तुळशीच्या माळा हा काशीकापडी समाज वर्षभर हाताने बनवत असतो.
मुळचा हा समाज आंध्र प्रदेशातील विठ्ठल भक्त म्हणून ओळखला जातो. आपल्या तुळशी माळांचा व्यवसाय पंढरपूरमध्ये चांगला चालेले, देवासोबत वारकऱ्यांची सेवा करायला मिळेल या भावनेतून 300 वर्षांपूर्वी हा समाज येथे स्थानिक झाला. या समाजातील 200 पेक्षा जास्त तरुण सध्या तुळशीच्या माळा बनविण्याचा व्यवसाय करीत असतात.
तुळशीच्या लाकडाला कातून मणी बनविले जातात आणि या मण्यांपासून माळ बनवली जाते. बनविलेल्या मण्यांच्या माळा ओवायचे काम या समाजाच्या महिला करीत असतात. या माळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये जप माळ, पाचपट्टी माळ, दोन पट्टी माळ, गोल मण्यांची माळ, डबलपट्टी, चंदन माळ, कातीव माळ असे यांचे प्रकार असून या माळेची किमत 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत असते.
वारकरी संप्रदायात ही तुळशीमाळ देवाच्या पायाला लावून आपल्या गुरु अथवा महाराजांच्याकडून गळ्यात घातली जाते. आता गेल्या काही वर्षांपासून या भक्तीच्या तुळशीमाळेत देखील डुप्लिकेट माळा बाजारात आल्या असून या बाभळी आणि इतर लाकडांपासून मशीनद्वारे बनविल्या जातात. अशा माळांना चायना माळ म्हणून ओळखले जाते. या माळेची किंमत 10 रुपयांपासून सुरु होत असल्याने भाविक या चायना माळेलाच तुळशीमाळ समजून खरेदी करतात आणि यातच त्यांची फसवणूक होते.
हातापासून बनविलेल्या तुळशीच्या लाकडाच्या माळा तयार झाल्यावर त्यांच्या मण्यांला लहान होल असतात. मात्र कोणत्याही लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्यांना मोठे होल असतात.
याशिवाय तुळशीच्या लाकडावर काळे डाग असतात, जे या दुसऱ्या चायना माळांवर नसतात. शिवाय वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या या खऱ्या तुळशीच्या माळा किमतीने महाग असतात.