एकनाथ खडसेंची 'खजूराची शेती', पाहा फोटो
एकनाथ खडसे यांनी शेतात खजूर लागवडीचा (Date Palm Farming) अनोखा प्रयोग केला आहे. आवड म्हणून केलेला हा प्रयोग मात्र नाथा भाऊंसाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या खजूराच्या शेतीचा आढावा एबीपी माझानं घेतला आहे.
एकनाथ खडसे यांच्या संपत्तीबाबत विरोधक नेहमीच प्रश्न चिन्ह उपस्थित करत असतात. मात्र आपल्या उत्पन्नाचं शेती हे एकमेव साधन असल्याचा दावा एकनाथ खडसे नेहमीच करतात. असाच काहीसा दावा खडसेंनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. खजूर शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पैसे मिळविता येतात, असं सांगताना खडसे यांनी त्यांच्या खजूराच्या शेतीचं उदाहरण दिलं.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरमधील त्यांच्या स्वतःच्या पंधरा एकर जमिनीमध्ये खडसे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी आखाती देशात येणाऱ्या खजूर पिकाची लागवड केली आहे.
नागपूर येथे एक कृषी प्रदर्शन पाहत असताना त्या ठिकाणी खजूर पिकाची यशस्वी लागवड केल्याची माहिती एका शेतकऱ्यानं त्यांना दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर आपणही ही खजुराची लागवड करावी, असा निर्णय त्यांनी घेतला. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत खजुराची लागवड केली होती. त्या शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन आपण मागील चार वर्षांच्या पूर्वी खजुराची लागवड केली आहे.
ही लागवड करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जमिनीची खोल नांगरट करून घेतली. त्यानंतर रोटावेतर करून घेतलं. यावेळी चार ट्रॉली शेणखत घातल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात याची रोपं मिळत नसल्यानं अरब देशातून अरबी खजुराची तिशू कल्चर रोपं मागवली. एका रोपांचा खर्च लागवड होईपर्यंत पाच हजार रुपयांपर्यंत आला.
एका एकरात शंभर रोप आपण लावली आहेत. लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षी काही प्रमाणात खजुराचं उत्पादन आलं होतं. शंभर रुपयांप्रमाणे जागेवरच ते विकलं गेलं असल्यानं मार्केटिंगची अडचण आली नाही.
यंदा चौथ्या वर्षी एका झाडाला साधारणतः तीस ते चाळीस किलो इतका माल एका झाडाला लागला असल्यानं एक झाडाचं उत्पन्न प्रतिझाड शंभर रुपये किलोप्रमाणे विचार केला, तरी तीन हजार रुपयांपर्यंत पडतं.
म्हणजेच, प्रती एकर तीन लाख रुपये आणि पंधरा एकरचा विचार केला तर पंचेचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न खडसे यांना खजूर शेतीमधून मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अरबी खजुराची चव ही अतिशय गोड असल्याने या खजुरापासून यंदा वाईन बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. मागील वर्षी नाशिक येथील सोमा वाईन कंपनीनं खजूर वाईन यशस्वी रित्या बनविली होती. असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
खजूर शेतीसाठी जमीन कोणत्याही प्रकारची असली तरी तापमान मात्र उष्ण स्वरूपाचं लागत असल्याचं खडसे सांगतात. तापमान जेवढं जास्त तेवढं खजूर उत्पादन जास्त येतं, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. खजूर शेतीमध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न येत असेल तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी याचा कोट्यावधी रुपयांचा खर्च अवाक्याबाहेर असल्यानं ते याची लागवड करू शकत नाहीत.
सर्वसामान्य शेतकऱ्याला खजूर उत्पादनातून आर्थिक फायदा घेण्यासाठी सरकारनं खजूर रोपांना सबसिडी दिली पाहिजे. बाजार पेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, तरंच खजूर शेती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडू शकेल, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
राजकारणात आपल्या संपत्तीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र शेतीमध्ये आपण सातत्यानं नवनवीन प्रयोग केले असून त्याचाच फायदा आपल्याला झाला आहे. त्याचंच उत्तम उदाहरणं म्हणून खजूर शेतीकडे पाहता येईल.