कोकणवासियांचा विश्वासघात? रिफायनरीचे काम सुरू झाल्याची चर्चा, पाहा फोटो
कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध सुरू असताना दुसरीकडे काही ठिकाणी उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता या उत्खननाच्या प्रकारामुळे कोकणात रिफायनरी विरोधकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या मुद्यावरून रिफायनरी समर्थक आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
राजवाडी, वाडा पाणेरी या गावात मागील काही दिवसांपासून जमिनीचं उत्खनन केले जात आहे. त्याठिकाणी मातीचे परिक्षण केले जात आहे. हे उत्खनन किंवा माती परिक्षण रिफायनरीच्या कंपनीकडून होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
ग्रामस्थ आणि रिफायनरीविरोधी संघटना यांनी याबाबतची तक्रार तहसिलदारांकडे केली आहे. मात्र, रिफायनरीचा अध्यादेश निघालेला नसताना किंवा जमीन अधिग्रहण झालेलं नसताना होत असलेलं उत्खनन नेमकं कोण करतंय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. रिफायनरीला अनेकदा स्थानिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. आता या माती परीक्षण अथवा माती उत्खननाचा प्रकार आल्याने आगामी काळात वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
रिफायनरीला होत असलेला विरोध दर्शवण्यासाठी विरोधकांनी राजापूर येथे मोर्चा देखील काढला होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं होतं. शिवाय, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्येही रिफायनरीविरोधातील ठराव करण्यात आला होता. त्यामुळे रिफायनरीचं भवितव्य नेमकं काय? याची चर्चा सुरु आहे.
तर, शिवसेनेमध्ये रिफायनरीच्या मुद्यावर मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. तर, भाजपने रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.