Jalna: माणसांप्रमाणेच मुंगुसांना लागली चहाची तलफ! प्राणीही झाले चहाचे शौकीन; पाहा मजेशीर फोटो...
मुंगुसांना देखील माणसांप्रमाणे चहाची तलफ लागते असं जर आम्ही म्हटलं तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र जालन्यात एक अशी चहाची टपरी आहे, जिथे दोन मुंगूस नियमित गरमागरम चहा प्यायला येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरमागरम चहा म्हटलं की आपल्या सारख्याच बऱ्याच जणांचं भान हरपतं आणि कधी चहा प्यायला मिळेल असं होतं. मात्र मुंगूसांबद्दलही काहीसं असंच ऐकून थोडं आश्चर्यच वाटतं.
तर, जालना शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी एक चहाची टपरी आहे. अशोक तीळवणे यांच्या चहाच्या टपरीवर रोज दोन मुंगूस चहाच्या ओढीने चक्कर मारतात.
टपरी उघडताच कधी एकदा चहा प्यायला मिळतो, अशी काहीशी भावना या मुंगूसांच्या मनात येते. हे दोन मुंगूस चहा प्यायला येतात आणि चहा प्यायला की निघून जातात. गेली सहा महिने मुंगूसांचा हा नित्यक्रम सुरू आहे.
त्याचं झालं असं की, सुरवातीला अशोक यांच्या टपरीवर फक्त माणसांचीच वर्दळ असायची. जशी माणसांची गर्दी कमी व्हायला लागायची तसे हे मुंगूस हळूच टपरीत यायचे आणि ग्राहकांच्या उष्ट्या चहाच्या कपात डोकं घालून बसायचे.
त्यामुळे एक दिवस टपरी चालवणाऱ्या अशोक यांनी या मुंगुसांना चहा ठेऊन पाहिला आणि काय आश्चर्य... या मुगुसांनी काही मिनिटांतच हा चहा फस्त केला.
तेव्हापासून, हे मुंगूस खास चहासाठीच टपरीत येत असल्याचं लक्षात आलं. आता या मुंगुसांना चहाची इतकी सवय झाली आहे की नित्यनियमाने ते चहा पिण्यासाठी टपरीवर येतात.
अशोक यांच्या टपरीवर इतर ग्राहकांसारखे हे दोन ग्राहक नियमित चहा प्यायला येतात आणि आता त्यांना देखील या मुगुसांचा लळा लागला आहे. ही मुंगुसं आल्यावर त्यांची दररोज चहा पाण्याची ते चोख व्यवस्था करतात.
त्यामुळे या मुगुसांना चहाची जणू तलफच लागली आहे आणि हीच तलफ टपरीवर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.