In Pics | कोरोना संकटामुळं सप्तश्रृंग गडावर प्रवेशास बंदी
कोरोना संकटाचं सावट आता आणखी गंभीर वळण घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील गर्दी होणाऱ्या श्रद्धास्थळांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. याच अंतर्गत श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरही प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. 1 ते 5 एप्रिल या काळात ही बंदी असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिर संस्थानच्या वतीनंच याबाबतची माहिती देण्यात आली. श्री क्षेत्र सप्तशृंगगड आणि कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविडचे रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत, सप्तशृंगगड यांनी जा. क्र 04/2021 नुसार जनता कर्फ्युचा निर्णय घेतला आहे.
सदर निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या आरोग्य तसंच जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा काही दिवसांसाठी बंद असणार आहे.
1 ते 5 एप्रिल या दरम्यान प्रवेश संपूर्णतः बंद असतील.
मंदिर, गडावर प्रवेश बंद असला तरीही श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल, असंही सांगण्यात आलं असून, सर्वांनीच या निर्णयात सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.