काटी येथील शिक्षित कुंभार बंधूंनी साकारलेल्या श्री आर्टमधील सुंदर व सुबक गौरी मुखवट्यांना परदेशात मागणी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्रीकांत बबन कुंभार आणि मंगेश बबन कुंभार या दोन बंधूंच्या श्री आर्ट्स कार्यशाळेत साकारलेल्या अतिशय सुंदर, आकर्षक, सुबक आणि बोलक्या गौरी लक्ष्मीचे मुखवटे महाराष्ट्रासह, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात तर विदेशात अमेरिका, कॅनडामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले असून अमेरिका व कुवेत देशात घरगुती गौरी बसवण्यासाठी गौरी मुखवटे पोहोचले असून तेथील देवीभक्तांकडून गौरी मुखवट्याबद्दल अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणपतीबरोबरच गौरीच्या मुखवट्यांवर शेवटचा हात फिरवला जातोय. काटीतील श्रीकांत कुंभार यांच्या श्री आर्टमध्ये सध्या याचीच लगबग दिसून येत आहे. श्रीकांत कुंभार यांचे आजोबा दिवंगत भानुदास कुंभार हे बैलजोडी, गणपती आणि गौरी मुखवटे तयार करायचे, त्यामुळे परंपरागत हा व्यवसाय गेली चाळीस वर्षांपासून सुरु आहे.
श्रीकांत कुंभार हे स्वतः पदवीधर आहेत तर त्यांचे धाकटे बंधू मंगेश कुंभार हे बीई सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त झालेले आहेत.
कला हेच जिवन मानुन कार्य मग्न होऊन आपल्या कुंचल्यातुन स्वत:च्या कलेला कुंभार वाड्यात जखडुन न ठेवता मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील या अवलिया कलाकार बंधूंनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून 5 इंच ते 10 इंचापर्यंत बनविलेल्या आकर्षक रंगरंगोटी, डोळ्यांची आकर्षक आखणी, सजीव डोळे, भुवया, धारदार नाक, ओठ, आकर्षक फिनिशिंग, बोलक्या चेहऱ्यांना रंग भरत गौरी मुर्तींना जान आणत आपली कला साता सुमद्रपार पोहचविण्यात यश मिळविले आहे.
या कामात त्यांचा मावस भाऊ विकास कुंभार याचीही साथ लाभली आहे. वर्षभर गौरी मुखवटे तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरु असते. सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जिवणी, सुबक ठेवणे, मुखवट्यांची फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर हे या मुखवट्यांचे वैशिष्ट्य आहे.
कुंभार समाज म्हटलं की परंपरागत मातीतून बनवलेल्या डेरा, घागर, गौरी गणपती मूर्ती बनवणारा समाज म्हणून ओळखले जायचे. परंतु, काटी सारख्या ग्रामीण भागातील श्रीकांत व मंगेश या शिक्षित बंधूंनी गौरी मुखवटे यांना परंपरागत रटाळ रंगरंगोटी न करता यामध्ये अभ्यासपूर्ण सुधारणा केली.
यामुळे विविध कलर शेड्स आणि डोळे हुबेहुब साकारले आहेत. तसेच गौरी व देवीच्या मुखवट्यांना आपल्या आवडीनुसार कर्णफुले झुबे व नथ घालण्यासाठी सोय केली आहे.
सध्या या बंधूंनी साकारलेल्या गौरी व देवींच्या मुखवट्यांना महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर या भागातून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व राजस्थान,केरळ या राज्यासह विदेशात अमेरिका, युरोप, कॅनडा, कुवेत या देशातही श्रीकांत कुंभार यांच्या श्री आर्टचे मुखवटे अगदी सातासमुद्रापार पोहोचलेत.
हे मुखवटे सुस्थितीत पॅकिंग करुन कुरियरद्वारे आतापर्यंत 600 मुखवटे पाठवले आहेत. त्यांच्या या कलेचे देश-विदेशातून समाधानी भाविक भक्त ग्राहकांतून कौतुक होत आहे.
तेथील ग्राहकांकडून मुखवट्यांबाबत मुखवटे खुपच सुंदर, सुबक, आकर्षक व सजीव असल्याच्या अशा चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
श्रीकांत कुंभार यांनी आपल्या कुटुंबातील आई, वडील,पत्नी, भाऊ भावजय, मावस भाऊ यांच्या साथीने परंपरागत कलेला आपल्या कुंचल्यातून ग्लोबल टच दिला आहे.
सध्या अमेरिका, कॅनडा येथील शॉपमध्ये श्री आर्टने बनवलेले मुखवटे विक्रीस गेल्याचे व भारतातून तिकडे स्थायिक झालेल्या कुटुंबियाकडून या मुखवट्यांना मागणी असल्याचे श्रीकांत कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
श्रीकांत व मंगेश या बंधूंनी विविध वेशभूषेतील गणेश मुर्तीसह गौरी मुखवटे बनवत आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे.
बहुतांश मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. विघ्नहर्ता गणेशाचा उत्सव एक दिवसावर तर गौरी उत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
काटीतील या सुबक व आकर्षक गणेश व गौरी मुखवट्यांना सर्वत्र मागणी वाढत आहे.
या मूर्तींच्या कोणीही प्रेमात पडेल अशाच आहेत.