Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न
छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले.
शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले.
दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले.
पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी त्यांना सोने दिले.
सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते.
नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
या सर्व कार्यक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजेय दळवी, आदित्य बेडेकर , ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी यांनी केले.