Jalna Accident News: मजूर झोपलेल्या शेडवरच चालकाने ओतली टिप्परमधील रेती; पाच मजुरांचा दबून मृत्यू, एका महिलेसह मुलीला वाचवण्यात यश

जालना जिल्ह्यामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम करणाऱ्या मजुरांवर झोपेत काळाने घाला घातली आहे. रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यामुळे मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात आज (शनिवारी) पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ गावात रोडवरती पुलाचे बांधण्याचे काम सुरू आहे. कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर या कामासाठी आलेले होते. पुलाचा बाजूलाच मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलं होतं, त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे.
काल (शुक्रवारी 21 फेब्रुवारी) रात्री सर्वांनी जेवण केलं. त्यानंतर पाच जण पत्र्याच्या शेडमध्ये झोपी गेले. दरम्यान या पुलाच्या कामासाठी शनिवारी पहाटेच्या सुमारास एक टिप्पर वाळू घेऊन आला. अंधारामध्ये टिप्पर चालकाने सगळी वाळू मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच टाकली. त्यामुळे सर्व मजूर रेतीखाली दबले गेले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
रेती पत्र्याच्या कारशेडवर टाकल्याने मोठी खळबळ उडाली. याची माहिती मिळाल्यानंतर टिप्पर चालक रात्रीतून पसार झाला.
घाईमध्ये रेती टाकत असताना चालकाने पत्र्याचे शेड असल्याचेही त्याने पाहिले नाही. अंधारात रेती टाकली आणि त्यांच्या एका चुकीने पाच मजुरांचा जीव गेला.
वाळूच्या ढिगार्यात सात जण अडकले. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर, मोठ्या प्रयत्नानंतर एका महिलेसह तेरा वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.