WFI President Controversy : पैलवान आंदोलनाच्या आखाड्यात; कुस्तीपटूंचा बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक भारतीय कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांचा विरोध करत आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दिल्लीच्या जंतरमंतरवर आपलं आंदोलन सुरू ठेवलं. विनेश फोगाटनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महासंघ त्यांचा मानसिक छळ करत असल्याचं या कुस्तीपटूंचे म्हणणं आहे. विनेशने लैंगिक छळाचा आरोपही केला आहे.
विनेश, साक्षी आणि बजरंग यांच्यासह अनेक दिग्गज नेते आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेशनं दावा केला आहे की, टोकियो ऑलिम्पिकनंतर बजरंग यांच्यासोबत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याबाबत तक्रारही केली होती. त्यावेळी गृहमंत्र्यांनी न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.
विनेशची बहिण गीता फोगट आणि बबिता फोगट यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनीही पैलवानांसोबत घडत असलेल्या अन्यायावर टीका केली आहे. गीताने ट्वीट केलं आहे की, आपल्या देशातील कुस्तीपटूंनी खूप धाडसी काम केलं आहे. WFI मधील खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं आणि सत्य सर्वांसमोर आणणं, तसेच या सत्याच्या लढाईत खेळाडूंना साथ देणं, हे आपल्या सर्व देशवासीयांचं कर्तव्य आहे.
कुस्तीपटूंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. विनेशने दावा केला होता की, मी किमान 10 ते 20 महिला कुस्तीपटूंना तरी ओळखते, ज्यांनी मला WFI अध्यक्षांद्वारे झालेल्या लैंगिक छळाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी त्याच्यासोबत घडलेला प्रकार मला सांगितला. मी कोणाचंही नाव घेऊ शकत नाही.
भारतीय कुस्ती महासंघाबाबत सुरु असलेल्या वादाने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. दरम्यान अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून कोणत्याही खेळाडूला मी त्रास दिलेला नाही, असं म्हटलं आहे. आरोप सिद्ध झाल्यास मी फासावर जाईन, असंही ते म्हणाले. माझ्याविरोधात कट रचला जात आहे, मात्र तरीही मी चौकशीसाठी तयार आहे, असंही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप झाल्यानंतर लखनौमध्ये आयोजित करण्यात येणारं शिबिर रद्द करण्यात आलं आहे. हे शिबीर 18 जानेवारीपासून सुरु होणार होतं. यामध्ये 41 पैलवान सहभागी होणार होते. मात्र, आता वादामुळे हे शिबीर रद्द करण्यात आलं आहे.