PHOTO : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक; काँग्रेसची गैरहजेरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 15 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा, सपचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, आपचे सुशील गुप्ता, भाकपचे विनय विश्वम, माकपचे निलोत्पाल बसू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेली बैठक माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंचच्या बॅनरखाली पार पडली. या बैठकीला आलेल्या नेत्यांनी याला राष्ट्र मंचच्या बॅनरखाली समविचारी पक्षांमधील संवाद असे म्हटले आहे
2018 मध्ये भाजपशी बिनसल्यानंतर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी हा मंच स्थापन केला होता. अनेक विरोधी पक्षांचे नेते या मंचात सामील झाले होते. समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, जेडीयूचे माजी खासदार पवन वर्मा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. काँग्रेसचे मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा हे दोन नेते देखील मंचाचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या मंचाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. या मंचाच्या सदस्यांना भेटण्याची इच्छा पवारांनी एकदा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय मंचाचे सदस्य नाहीत, पण तरीही बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यामुळेच या बैठकीकडे कोणही दुर्लक्ष करुन शकत नाही, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात सोमवारी एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यानी सांगितलं की, राष्ट्रमंचची बैठक भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी बोलावली आहे. मात्र असं काहीच नाही. ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली आहे. मात्र ही बैठक शरद पवार यांनी बोलावली नव्हती. ही बैठक राष्ट्रमंचाचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. आम्ही सर्व जे राष्ट्रमंचाचे सदस्य आहोत, आम्ही सर्वांनी मिळून या बैठकीचे आयोजन केले होते.
दरम्यान काँग्रेसचे मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा हे दोन नेते देखील मंचाचे सदस्य आहेत. पण दोघेही दिल्लीत नसल्यामुळे बैठकील अनुपस्थित राहिल्याचे माजिद मेमन यांनी सांगितले.