Ram Navami : रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाई पर बचन न जाई... सियावर राम चंद्र की जय...
वसंत ऋतू जाऊन चैत्र येतो... आणि सृष्टी कूस बदलते अन् झाडा-झुडपांना नवी पालवी फुटते... भवतालाला हिरवाकंच रंग चढतो... अवघी धरती थरारून जाते... पाखरं-पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो... नद्यांचं पोट पाण्याच्या खळखळटाने आनंदून जातं... कानात मधूर गुंजारवर करत वारा बासरी बाजवू लागतो...अन् त्यातच कुठूनसा आवाज येऊ लागतो... दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला... राम जन्मला गं सखे, राम जन्मला... ज्याने अवघ्या जगावर मानवतेचं तोरण बांधलं आणि आदर्श अशा राज्यकारभाराचं धोरण बहाल केलं... ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम भूमंडळी अवतरले, त्याची ही दुही होती... दिपून जाय माय, स्वत: पुत्र दर्शने... ओघळले आसू, सुखे कंठ दाटे... एका बाजूला कौसल्याराणीची ही अवस्था तर, रयतेतून आपला तारणहार, राजा आल्याचा हर्षोल्हास... हाच आनंदसोहळा शरयू तीरावर कसा संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवांचा देव असलेल्या विष्णूचा सातवा अवतार जन्माला आला आणि अयोध्येची माती आनंदून गेली... साताजन्माचं पुण्य अयोध्यानगरीच्या पदरी पडलं... घराघरांवर रत्न-तोरणे, अवती भवती रम्य उपवने... त्यात रंगती नृत्य गायने... अशी काहीशी अवस्था अयोध्यानगरीची झाली... शरयू नदीचं संथ पाणी देदिप्यमान चमक लेवून शहारून गेलं... त्या परुषोत्तम राजाची पावलं आपल्याही भाळी लागतील, या कल्पनेने शरयूतीर लोभस झाला... आणि मग चाहुल लागली... दीन-दुबळ्या जनतेच्या कल्याणाची... मानवतेच्या वाटचालीची... दया-माया- क्षमा आणि शांती या चतु:सूत्रीची... जिथं, रागाचा ना लवलेश आहे, ना लोभाची आस... ना द्वेशाचा ध्यास आणि नाही मत्सराची सावली... रामपर्व सुरू जाहले, ज्याची दिशा फक्त आणि फक्त एकच... राजसौख्य ते सौख्य जनांचे... एकच चिंतन लक्ष मनांचे.
भगवान श्रीराम लहानपणापासून शांत आणि शूर स्वभावाचे होते. जगण्यात संस्कार आणि वागण्यात पावित्र्य असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं... म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम अशा नावाने ओळखलं जातं. न्याय्य कारभार, गोरगरिबांचा जयजयकार आणि रयतेचं सूख हाच व्यवहार... अशा तत्वांना आजही रामराज्य अशा नावानेच ओळखलं जातं. प्रभू रामचंद्रांच्या राज्यकारभाराने जनता कृतज्ञ झाली... आणि एक नवी उमेद, एक नवा उत्साह जनतेच्या मनात निर्माण झाला...
तपोभूमीवरची दहशतीची जळमटं झिडकारून लावली... नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू... श्रीरामाचे गीत गात, श्रीरामालाच पार करू... असा विश्वास प्रभू रामांनी जनतेला दिला... पावन गंगा, पावन राम... श्रीरामाचे पावन नाम... यशोविजयाचे तोरण लावू, रामराज्य हे नित्य स्मरू.... ज्याच्यामुळे अशी नवी उमेद जनतेच्या मनात निर्माण झाली, त्याचं नाव एकच... रामराज्य... याच रामराज्याची उभारणी करणाऱ्या श्रीरामाच्या मंदिराची पायाभरणी झालीय.
मग आली लग्नघटिका समीप... सीतास्वयंवर... प्रभू रामचंद्रांना सीतामय्या सहचारिणी म्हणून मिळाल्या... त्याची गोष्टही रोचक आणि तितकीच चित्तथरारकही आहे. जनक राजाने आपल्यी कन्या सीताचा विवाह करण्यासाठी स्वयंवर सोहळा आयोजित केला होता. जो राजा शिवधनुष्य उचलेल त्याच्याशी कन्येचा विवाह करून देणार अशी राजा जनकाची अट होती. या सोहळ्यासाठी अनेक राजे-रजवाडे आले होते.
उपस्थित सगळ्या प्रयत्न करून शिवधनुष्य जागचे हलले नाही. आणि मग प्रभू रामचंद्र पुढे सरसावले... क्षणार्धात शिवधनुष्य लिलया उचललं. आणि ते अर्पण करतानाच, ताडकन् असा आवाज झाला... दरबारातील सगळे उपस्थित अवाक झाले... आणि अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांना सीतामय्या मिळाल्या... श्रीरामाने सहज उचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनकाचे हेतू अंतरीचे... आकाशाशी जडले नाते, ऐसे धरणीचे... प्रभू राम आणि सीतामय्याच्या साथसोबतीचं असं यथार्थ वर्णन म्हणूनच केलं गेलंय.
रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाई पर बचन न जाई... असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या एकवचनी प्रभू रामचंद्राचा आज जन्मदिवस, अर्थात रामनवमी... हा सोहळा अखंड भारतात आणि जगभरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला... त्याचाच आढावा आपण आज घेतला... रामाचं आयुष्य आपल्याला भविष्यासाठी पुरणार आहे आणि उरणारही आहे... म्हणूनच, प्रभू रामचंद्रांच्या विचारांची तत्व, सत्व आणि महत्त्व आपणही अंगीकारण्याचा संकल्प करू.