Central Vista : नरेंद्र मोदी... नवीन संसदेची इमारत अन् लार्जर दॅन लाईफ इमेज, पाहा फोटो
देशातील नवीन संसद भवनाचे, सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी अचानक नवीन संसद भवनाला भेट देण्यासाठी दाखल झाले. येथे त्यांनी तासाभराहून अधिक वेळ घालवला. पंतप्रधानांनी यावेळी प्रत्येक तपशीलाचा आढावा घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन संसद भवनातील विविध कामांची पंतप्रधान मोदींनी पाहणी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात उपलब्ध असलेल्या सुविधाही त्यांनी पाहिल्या. पंतप्रधानांनी बांधकामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला. पंतप्रधानांसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. केंद्र सरकारने 2019 मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला. यामध्ये नवी दिल्लीतील इतर प्रकल्पांसह संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा समावेश आहे.
हे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. त्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली. नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे. नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे.
ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.
संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.
13 एकरावर नवीन इमारत बांधली जात आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या साडेतीन चार किलोमीटर परिसरामध्ये हा प्रकल्प उभारला जातो आहे. केंद्रीय मंत्रालयांच्या सर्व इमारती एकत्रित एकाच ठिकाणी उभारणे, पंतप्रधानांचं नवीन निवासस्थान उपराष्ट्रपती यांचे नवीन निवासस्थान, एस पी जी मुख्यालय हे या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहे.
डिसेंबर 2022 अखेरीपर्यंत पंतप्रधानांचं नवं निवासस्थान या प्रकल्पांतर्गत पूर्ण होईल. त्यानंतर हळूहळू इतर इमारतीही साकारतील. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनाच्या संपूर्ण हिरवळीत मोदींचा हा नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे.