दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (3 डिसेंबर 2022) दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या वर्ष 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, दिव्यांगजनांची संख्या जगात एक अब्जपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ जगातील प्रत्येक आठवी व्यक्ती दिव्यांग आहे. भारताच्या लोकसंख्येत दोन टक्क्यांहून अधिक व्यक्ती दिव्यांग आहेत. अशा व्यक्तिंना मानाने स्वावलंबी आयुष्य जगता यावे यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. दिव्यांगजनांना चांगले शिक्षण, घरात व समाजात सुरक्षितता, त्यांचे कार्यक्षेत्र निवडण्याची मुभा आणि रोजगाराच्या समान संधी मिळतील हे पाहणे हे आपले कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
भारतीय संस्कृती आणि परंपरेने दिव्यांगाकडे ज्ञानप्राप्ती आणि प्रगती साधण्याच्या मार्गातील अडथळा म्हणून कधीही पाहिले नाही. किंबहुना, अनेक वेळा दिव्यांगजनांमध्ये निसर्गाने भेट म्हणून दिले असावेत असे विशेष गुण असतात. विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांगजनांनी जिद्द, चिकाटी आणि स्व-कौशल्याच्या जोरावर मोठे यश मिळवल्याची असंख्य उदाहरणे आपल्याकडे आहेत. पुरेशा संधी आणि पोषक परिस्थिती निर्माण करून दिल्यास दिव्यांगजन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रत्येक व्यक्तिला विशेषतः दिव्यांग व्यक्तिला सक्षम करण्याची गुरुकिल्ली ‘शिक्षण’ ही आहे. शिक्षण घेण्यात भाषेमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा आणि दिव्यांग बालकांना शिक्षण घेणे सहज शक्य होईल अशी व्यवस्था निर्माण करावी, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
दिव्यांग मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने आवश्यक तरतुदी करण्यासंबंधीचं महत्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अधोरेखित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एनसीईआरटीच्या इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचं भारतीय सांकेतिक भाषेत रूपांतर केलं असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ही कृती म्हणजे कर्णबधीर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठीचा महत्त्वाचा उपक्रम असल्याचं त्या म्हणाल्या.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. दिव्यांग व्यक्तींमध्येही इतर सामान्य लोकांप्रमाणेच प्रतिभा आणि क्षमता असतात, कधीकधी त्या त्यांच्यापेक्षाही अधिक असतात असं राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांना स्वावलंबी बवनण्यासाठी केवळ त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्याची गरज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व्हावं, जगण्यात प्रगती करावी यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.
ज्यावेळी आपले दिव्यांग बंधू-भगिनी मुख्य प्रवाहात सामील होऊन स्वतःचं प्रभावी योगदान देऊ लागतील, तयाळे आपला देश विकासाच्या मार्गावर वेगानं वाटचाल करू लागेल, असं त्या म्हणाल्या.
दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष 2021-22 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गौरविण्यात आले. यासह महाराष्ट्रातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रपती श्रीमती मुर्मू, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, केंद्रीय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
याकार्यक्रमात वर्ष 2021 साठी एकूण 25 राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील तीन दिव्यांग आणि अकोला जिल्हा परिषदचा समावेश आहे. तर वर्ष 2022 मध्ये एकूण 29 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाला सुगम्य भारत अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल, एक दिव्यांग आणि एक गैरशासकीय संस्थेचा समोवश आहे.