अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो एअरपोर्ट, इटानगर’ चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
डोनी पोलो विमानतळाचा शुभारंभ हा विमानतळाच्या पायाभरणीला निवडणुकीची खेळी संबोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर आहे - पंतप्रधान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटानगर येथील डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन केले तसेच 600 मेगावॅट क्षमतेचे कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन राष्ट्राला समर्पित केले. या विमानतळाची पायाभरणी खुद्द पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीसारखी मोठी आव्हाने असताना देखील विमानतळाचे काम अल्पावधीतच पूर्ण झाले आहे.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी अरुणाचलला त्यांनी वारंवार दिलेल्या भेटींचे स्मरण केले आणि आजच्या कार्यक्रमाच्या भव्यतेवर लक्ष दिले तसेच आपल्या राज्याच्या विकासाप्रति अरुणाचलच्या जनतेच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी बदललेल्या कार्य संस्कृतीचा उल्लेख केला जिथे ते पायाभरणी करण्याची आणि त्याच प्रकल्पाचे स्वतःच राष्ट्र समर्पण करण्याची परंपरा प्रस्थापित करत आहेत. या विमानतळाचे लोकार्पण म्हणजे निवडणुकांवर लक्ष ठेवून केलेली खेळी असे संबोधून विमानतळाच्या पायाभरणीची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर असल्याचेही ते म्हणाले.
पीएम मोदी आपल्या भाषणात म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का? की, आम्ही एक अशी कार्यसंस्कृती आणली आहे, ज्याच्या माध्यमातून हे सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, त्यांचे उद्घाटनही करते. पूर्वीच्या सरकारप्रमाणे 'अडकले, लटकले, भटकले'चे युग गेले. दिशाभूल करण्याची वेळ गेली असं मोदी म्हणाले आहेत.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आमचे स्वप्न फक्त भारतमातेसाठी आहे, अरुणाचलच्या या यशाबद्दल संपूर्ण ईशान्येचे अभिनंदन, पूर्वी लोक इथे फक्त निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता इथले आता वातावरण बदलत आहे. आता केवळ प्रयत्नच नाही तर विकासही दिसत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात ईशान्य प्रदेशाला उदासीनता आणि दुर्लक्षीतेचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी भारतातील सर्वात लांब पूल, सर्वात लांब रेल्वे पूल, रेल्वे मार्ग संपर्क सुविधा आणि महामार्गांचे विक्रमी बांधकाम या प्रदेशात झालेल्या विकास कामाची उदाहरणे दिली. “हे अपेक्षा आणि आकांक्षांचे नवे युग आहे आणि आजचा कार्यक्रम हा भारताच्या नव्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की डोनी पोलो विमानतळ हे अरुणाचल प्रदेशसाठी चौथे कार्यरत विमानतळ असेल, ज्यामुळे ईशान्य प्रदेशातील एकूण विमानतळांची संख्या 16 वर गेली आहे. 1947 ते 2014 पर्यंत, ईशान्य भागात फक्त 9 विमानतळ बांधले गेले तर गेल्या आठ वर्षांच्या अल्पावधीत ईशान्येत 7 विमानतळे बांधली गेली आहेत. या प्रदेशातील विमानतळांचा हा वेगवान विकास ईशान्येकडील संपर्क सुविधा वाढवण्यावर पंतप्रधानांचा विशेष भर दर्शवितो.
“गरिबांनी सुखी जीवन जगावे याला सरकारचे प्राधान्य आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी डोंगराळ प्रदेशात शिक्षण आणि आरोग्य प्रदान करण्याच्या मागील सरकारांच्या प्रयत्नांबद्दल खेद व्यक्त केला.