Pariksha Pe Charcha 2023 | परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र!
जाणून घ्या पीएम मोदींच्या कार्यक्रमातील ठळक मुद्दे...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27 जानेवारी) देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला.
तालकटोरा इथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी ऐकल्या, त्यांना सल्ला दिला.
ते म्हणाले की, सर्व मुलांनी परीक्षेची वेळेत तयारी करावी जेणेकरुन शेवटच्या क्षणी येणारा ताण टाळता येईल.
मदुराई केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी हिने पंतप्रधानांना परीक्षेचा ताण, परीक्षेचे दडपण आणि परीक्षेत जास्त गुण मिळवण्याचा दबाव यावर प्रश्न विचारला. तसंच इतर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना विचारले की, परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत, तर कुटुंबाच्या दबावाला कसे सामोरे जायचे? यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं की जसे क्रिकेटमध्ये गुगली म्हणजे लक्ष्य एक आणि दिशा वेगळी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर बाद करु इच्छिता, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
कुटुंबातील सदस्यांना तुमच्याकडून अपेक्षा असणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यात गैर काहीच नाही, असं उत्तर पंतप्रधानांनी दिले. सामाजिक स्थितीमुळे कुटुंबातील सदस्य अपेक्षा करत असतील, तर ही चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं असलं तरी समाजात गेल्यावर मुलांबद्दल काय सांगणार असा विचार पालकांच्या मनात येतो, काहीवेळा विद्यार्थ्यांची स्थिती माहित असूनही, त्यांची सामाजिक स्थिती लक्षात घेऊन पालक समाजात मुलांबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगतात आणि मग घरी येऊन मुलांकडून तशीच अपेक्षा करतात. अशा परिस्थितीत मुलांवर सतत चांगले आणि चांगले गुण मिळवण्याचा दबाव निर्माण होतो.
विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोणत्याही दबावाखाली येऊ नये, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले की तुमची क्षमता खूप जास्त आहे आणि तुम्ही स्वतःचे योग्य मूल्यमापन करु शकत नाही असं नाही. पालकांनी मुलांवर अभ्यासासाठी जास्त दबाव टाकू नये, पण मुलांना त्यांच्यातील क्षमता कमी पडू देऊ नये, असं ते म्हणाले.
हिमाचलच्या आरुषी ठाकूरने पंतप्रधानांना विचारले की, परीक्षेदरम्यान अभ्यास कुठून सुरु करायचा हे स्पष्ट होत नाही.
मला अनेकदा असे वाटते की मी अभ्यास केलेलं सर्व काही विसरले आहे. इतर अनेक विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीसाठी वेळ व्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले. केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्यातही वेळेच्या व्यवस्थापनाचं भान ठेवायला हवं, असे पंतप्रधान म्हणाले.
जे काम करायचे होते ते योग्य वेळी न केल्याने अनेकदा कामांचा ढीग पडतो, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
कोणत्या विषयाचा अभ्यास किती दिवस आणि केव्हा करायचा आहे, याचं विश्लेषण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले की, आपल्याला आवडणाऱ्या किंवा माहित असलेल्या विषयांमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्यातच गुंतून जातो.
ते म्हणाले की, ज्या विषयात तुम्हाला अडचण येते, तो विषय आधी नव्याने वाचण्याचा प्रयत्न करा.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, जर तुम्ही तुमच्या आईची घरातील कामाची शैली पाहिली तर तिच्याकडूनही तुम्ही वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन शिकू शकता. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळेचं योग्य वाटप करण्याचं सांगितलं.
(Photo : ANI)