जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट
जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले.
विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हातकागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.
वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगड मधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.