Navratri 2022 : नवरात्रोत्सवात महाराष्ट्रातील 'या' देवीच्या मंदिरांना नक्की भेट द्या
नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी पुन्हा एकदा सगळीकडे गरबा आणि दांडियांचा सूर ऐकू येणार आहे. गरब्यासोबतच नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घेण्याची देखील एक प्रथा आहे. महाराष्ट्रात देखील काही प्रसिद्ध देवी मंदिरं आहेत, जिथे केवळ नवरात्रच नव्हे तर, देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण वर्ष गर्दी असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरचे ‘महालक्ष्मी’ मंदिर हे महराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. देवीच्या शक्तीपीठांपैकी एक असे हे मंदिर आहे. कोल्हापूरचे हे महालक्ष्मी देवीचे मंदिर ‘दक्षिणेची काशी’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुर मर्धिनी, विठ्ठल रखमाई, शिवाजी, विष्णू, तुळजा भवानी इत्यादी देवतांचीही पूजा केली जाते.
सोलापूरात तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून, नवरात्रीच्या काळात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवी मंदिर 4800 फूट उंच सप्तशृंगा पर्वतावर आहे. नाशिकपासून हे शक्तीपीठ सुमारे 60 किलोमीटर अंतरावर विराजमान आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली होती. पुरण कथेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रगट झाली आणि देवीने महिषासुराचा वध केला होता.
‘मुंबा’ देवीच्या मंदिरामुळेच स्वप्नांच्या या शहराला ‘मुंबई’ असे नाव पडले आहे. मुंबा देवीचे मंदिर मुंबईतील भुलेश्वर येथे आहे. मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांची माऊली अशी ‘मुंबा’ देवीची ओळख. केवळ नवरात्रच नव्हे तर, वर्षाच्या बाराही महिने या मंदिरात भाविकांची गर्दी असते.
लोणावळ्यापासून 8 किमी अंतरावर असलेले ‘एकवीरा देवी’ मंदिर हे कार्ला लेण्यांजवळ असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरात ऋषी परशुरामाची आई म्हणून देवी एकवीरेची पूजा केली जाते. हे मंदिर एका टेकडीवर वसलेले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 500 पायऱ्या चढून जावे लागते.