Navratri 2022 : ‘शैलपुत्री’ ते ‘सिद्धिदात्री’; नवरात्रीत देवीच्या 'या' रूपांचा करतात जागर!
26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतेय. या दरम्यान नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा करून नवरात्र साजरी केली जाते. देवीची ही नऊ रूपे कोणती ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे. पर्वतराजा हिमालयाच्या घरी जन्म झाल्यामुळे देवी दुर्गाच्या या रुपाला ‘शैलपुत्री’ असं नाव दिलं गेलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी शैलपुत्रीची मनोभावे पूजा केल्याने घरात धनधान्य समृद्धी राहते, असे म्हटले जाते.
ब्रह्म म्हणजे तपश्चर्या, कठोर तपश्चर्या करणाऱ्या देवीच्या रुपाला ‘ब्रह्मचारिणी’ म्हणतात. भगवान शिव अर्थात शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याशी विवाह करण्यासाठी माता पार्वतीने वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केली. म्हणून देवीच्या या रुपाला ‘ब्रह्मचारिणी’ म्हणून ओळखले जाते.
देवी दुर्गेचं तिसरं रूप आहे ‘चंद्रघंटा’. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाच्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, म्हणून तिला चंद्रघंटा असे म्हणतात. देवीच्या या रुपाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. ‘कुष्मांडा’ मातेने आपल्या स्मितहास्याने या विश्वाची निर्मिती केली होती, म्हणूनच तिला विश्वाची महाशक्ती म्हणून ओळखले जाते. देवीच्या या रुपाची आराधना केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात, असे मानले जाते.
माता पार्वती ही कार्तिकेयची माता देखील आहे. ‘स्कंद’ हे कार्तिकेयचे एक नाव आहे, म्हणून स्कंदाची माता ‘स्कंदमाता’ म्हणून देवीचे हे रूप ओळखले जाते. स्कंदमातेची उपासना त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि तो विद्वान बनतो, असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनीची पूजा केल्याने भक्तांना अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष अशी चारही फळे प्राप्त होतात, असे मानले जाते. महर्षी कात्यायनाच्या आश्रमात देवीमातेचा जन्म झाला होता. ज्या वेळी महिषासुराचा अत्याचार खूप वाढला होता, त्या वेळी त्रिदेवाच्या तेजातून मातेचा जन्म झाला, असेही म्हटले जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. काल म्हणजे मृत्यू आणि रात्र म्हणजे अंधार, म्हणून ‘कालरात्री’ म्हणजे अंधार आणि अज्ञानाचा विनाश. ‘कालरात्री’ हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप आहे. कालरात्री मातेचे रूप अतिशय भयंकर असले, तरी शुभ फळ देणारे आहे.
देवी मातेने मोठी तपश्चर्या करून गौर वर्ण प्राप्त केला होता, म्हणूनच तिच्या या रुपाला ‘महागौरी’ म्हणतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, असे मानले जाते.
आपल्या भक्तांना सर्व सिद्धी देणारी देवी असल्यामुळे, तिच्या या रुपाला ‘सिद्धिदात्री’ असे म्हणतात. देवी सिद्धिदात्रीचे हे रूप भक्तांच्या सर्व दैवी इच्छा पूर्ण करणारे आहे. या रूपात माता कमळावर विराजमान आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.