Health Tips : अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, गंभीर आजारांना कारणीभूत ठरेल 'ही' चूक

मनुष्य त्याच्या आयुष्यातील सुमारे 30 टक्के काळ झोपेत घालवतो. योग्य आहारासोबतच पुरेशी आणि शांत झोप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देते. झोपेच्या विकारांमुळे हृदयासंबंधित आजार उद्भवतात. यासोबतच धमनीसंबंधित आजार, मधुमेह, सेरेब्रोव्हस्कुलर आणि कार्डिओमेटाबॉलिक रोग यासारख्या अनेक रोगांचा धोकाही वाढू शकतो.

अलिकडील संशोधनात असं दिसून आलं आहे की, दररोज एक तास झोप वाढल्याने हृदयाला पुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील कॅल्सिफिकेशन 33 टक्के कमी होऊ शकते.
दररोज पुरेशी झोप घेणं हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण सध्याच्या व्यस्त जीवनात स्पर्धा वाढत असल्याने अनेकांना त्यांची झोप कमी करावी लागते. त्यामुळे अनेक जण उशिरा झोपतात आणि लवकर उठतात.
साधारण 20 ते 50 वयोगटातील व्यक्तीसाठी सहा ते आठ तासांची झोप गरजेची आहे. पुरेशी झोप घेतल्याने व्यक्तीला उत्साह येतो आणि त्याचं आरोग्य सुधारते हे संशोधनात सिद्ध झालं आहे.
दिवसा जास्त झोप लागणे किंवा तंद्री लागणे हा बर्याच लोकांची सामान्य तक्रार असल्याचं दिसून येतं. अशी झोप आपल्या कामाच्या वेळेत अकार्यक्षम बनवते. तसेच अनेकांना निद्रानाशाची समस्याही दिसून येते.
दरम्यान, सध्या बहुतेकांमध्ये स्लीप ॲपनिया आजार दिसून येतो. या आजारात झोपेत अचानक श्वासोच्छवास बंद होतो. श्वासोच्छवास काही सेकंदांपासून एक मिनिटांपर्यंत थांबतो आणि पुन्हा सुरळीत होतो.
व्यक्तीला अनेकदा हे झोपेत हे कळतंही नाही. स्लीप ॲपनिया असणाऱ्या व्यक्ती अनेकदा झोपेत घोरतात.
सामान्यत: झोपेचा विकार असलेल्या व्यक्तींना श्वासोच्छवासाचा त्रास होतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे की, वजन वाढल्याने स्लीप ॲपनिया (OSA) होण्याची शक्यता असते
त्याचप्रमाणे वजन कमी केल्याने स्लीप ॲपनिया (OSA) शी संबंधित तीव्रता आणि लक्षणे कमी होतात. स्लीप ॲपनियाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांसाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.