Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार,4000 युवकांना संधी देणार, महाराष्ट्रात किती जागा भरणार?

बँक ऑफ बडोदानं द अप्रेंटिसशिप कायदा 1961 नुसार विविध राज्यातील विविध विभागांमध्ये युवकांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं 4000 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष कामात सहभागी करुन घेत युवकांना बँकिंग संदर्भातील प्रशिक्षण दिलं जाईल. बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसशिप करायची असल्यास उमेदवारानं नॅशनल अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. संबंधित उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. निवड झाल्यानंतर त्याला 12 महिने प्रशिक्षण दिलं जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बँक ऑफ बडोदानं विविध राज्यांमधील बँकेच्या शाखांमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले आहेत. 4000 पैकी 573 जागा गुजरातमध्ये, 537 जागा कर्नाटकमध्ये, 388 जागा महाराष्ट्रात,558 जागा उत्तर प्रदेशात भरल्या जाणार आहेत. इतर राज्यातील मिळून एकूण 4000 जागा भरल्या जातील. महाराष्ट्रातील 388 पैकी सर्वाधिक जागा मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाखांमध्ये आहेत.

बँक ऑफ बडोदामध्ये ज्यांना अप्रेंटिसशिप करायची आहे त्यांनी प्रथम एनएटीएस किंवा एनएपीएसच्या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रियेसाठी स्कॅन केलेलं आधार कार्ड दोन्ही बाजू, पॅन कार्ड, ईमेल, मोबाईल नंबर, फोटो, दहावी ते पदवी शिक्षणापर्यंतच्या गुणपत्रकांच्या स्कॅन कॉपी, बँक पासबूक आणि सही स्कॅन करुन अपलोड करणं आवश्यक आहे.
एनएपीएस किंवा एनएटीएसच्या वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर तिथं तुम्हाला बँक ऑफ इंडियाच्या जाहिरातीनुसार अप्लाय अगेन्स्ट अॅडव्हरटाईज्ड वॅकेन्सीजवर क्लिक करावं. नोंदणी पूर्ण केल्यानंतर परीक्षेसाठी अर्ज मिळेल. तो भरुन द्यावा. त्यानंतर तुम्हाला जो नोंदणी क्रमांक मिळेल तो लक्षात ठेवा.
100 मार्कांची ऑनलाईन परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल, त्यामध्ये आर्थिक जागरुकता, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, संगणक ज्ञान आणि सामान्य इंग्रजीचे प्रश्न असतील. 60 मिनटांची परीक्षा असेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल. ज्या राज्यात अप्रेंटिसशिप करायची आहे त्या राज्यातील भाषेची चाचणी घेतली जाईल. शहरी भागातील शाखेत अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना 15 हजार तर ग्रामीण भागातील शाखेत काम करणाऱ्यांना 12 हजार रुपये विद्यावेतन मिळेल. यासाठी शुल्क देखील जमा करावं लागेल. खुला प्रवर्ग 800 रुपये, एससी, एसटी आणि महिलांसाठी 600 रुपये तर दिव्यांगांना 400 रुपये भरावे लागतील. यासाठी 19 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान अर्ज करता येतील.