'एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...' मकरंद अनासपुरे म्हणाले..
राज्यासह देशभरात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक उमेदवार, राजकीय पक्ष आश्वासने देत आहेत. सत्तेत आल्यानंतर काय करू याचे दावे, आश्वासने देत आहेत. सत्तेची सूत्रे हाती आली तर आपण बदल करू असे राजकारण्यांसह सगळ्यांना वाटते.
अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या उत्तरावर तु्म्ही त्यांचे कौतुक कराल.
मकरंद अनासपुरे यांचा 'राजकारण गेलं मिशीत'हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने मकरंद अनासपुरे यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना मकरंद अनासपुरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मकरंद अनासपुरे यांना राजकारण, सध्या असलेली राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारण्यात आले होते.
मकरंद अनासपुरे हे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सामाजिक-राजकीय विषयांवरही ते भाष्य करतात. एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला तर काय कराल, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यात आधी मी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेईल असे उत्तर दिले.
. त्याशिवाय, दुसरा निर्णय हा शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करू असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. डॉ. स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबतच्या शिफारसी केल्या होत्या. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर राजकीय पक्षांनी अनेकदा आश्वासने दिली. मात्र, उत्पादन खर्चावर शेतमालाला हमीभाव हा कागदावरच राहिला.
शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत. एका बाजूला शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे शेतमालाला त्यानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात अडकला आहे. देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक संकट, शेत मालाला हमीभाव नसणे तर दुसरीकडे वीज, खतांची दरवाढीसह उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडलं आहे.
मकरंद अनासपुरे यांना सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी परखड मत व्यक्त केले. सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटते, असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले. मतदान करताना तो उमेदवार, व्यक्ती पाहून मत दिले असते. आता, ज्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केले असते त्या माणसाने कोलांटउडी मारल्यानंतर फसवणूक झाल्यासाऱखी वाटते, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचे भवितव्य हे तरुणाईच्या हाती असल्याचे त्यांनी म्हटले.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, नाना पाटेकर यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीवर भाष्य केले. मला लोकांच्या मनाच्या मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास आवडेल असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.