Investment : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी 'हे' आहेत गुंतवणूक पर्याय
आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी प्रत्येक पालकांना असते. मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी पालकांनी गुंतवणूक करावे असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही बाजारातील जोखीम लक्षात घेताही गुंतवणूक करू शकता. जर, तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही पर्यायांवर विचार करता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीर्घकालीन आणि जोखीम मुक्त गुंतवणुकीसाठी तुम्हाला मुदत ठेवीचा पर्याय आहे (Fixed Depoist). मुदत ठेवीत तुम्ही सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी 10 वर्षासाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 2.90 टक्के ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.
तुम्ही बाजारातील जोखीम स्वीकारून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही म्यु्च्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी द्वारे गुंतवणूक करणे एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये तुम्ही किमान 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता. याद्वारे चांगली बचत होऊ शकते.
पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचाही (PPF) पर्याय तुमच्याकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे. .पीपीएफमध्ये सध्या 7.1 टक्के व्याज दर मिळू शकतो. यामध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीवर तु्म्हाला आयकर कायद्यातील 80 सी नुसार कर सवलत मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही मुलीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज दराने परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही नवजात बालिकेपासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. यामध्ये दरवर्षी 250 रुपये 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करू शकता. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या खात्यातून अंशत: रक्कम काढू शकता. तर, मुलीने वयाची 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर ती खात्यातील सर्व रक्कम काढू शकते. या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यातील '80 सी' नुसार कर सवलत मिळू शकते.
मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधताना महागाई दरही लक्षात घ्यावा. तरच, तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेता येईल. गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकता.