Ahmednagar News : शनिशिंगणापूर चौथऱ्याचं दर्शन भाविकांसाठी बंद? मंदिर देवस्थानाकडून माहिती समोर
एका शनिभक्ताने शनिशिंगणापूर येथे शनिदेवासाठी दान दिलेल्या नव्या रेखीव, नक्षीदार अशा चौथऱ्याच्या कामास सुरुवात होणार असल्याने उद्यापासून चौथऱ्यावरील दर्शन बंद केले जाणार अशा बातम्या काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, उद्यापासून चौथऱ्यावरील दर्शन बंद होणार नाही, चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यापूर्वी भाविकांना आधीच सूचना दिली जाईल असं देवस्थानाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अजून सात ते आठ दिवस लागू शकतात, त्याच्या आधी देखील काम सुरू करण्याची वेळ आली तर तशा सूचना देवस्थानाकडून दिल्या जातील असं विश्वस्त मंडळातील पदाधिकारी आप्पासाहेब शेटे यांनी स्पष्ट केले आहे.
जेव्हा नवीन चौथऱ्याचे काम सुरू होईल तेव्हा केवळ चौथऱ्यावरून शनी दर्शन घेता येणार नाही. मात्र, इतर दर्शन सुरू असेल असंही देवस्थानाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नव्या चौथऱ्याची उत्सुकता असलेल्या जगभरातील शनिभक्तांना जुलै महिन्यात नवा चौथरा दृष्टीस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चौथऱ्याचे काम महिनाभर चालण्याची शक्यता असल्याने त्या काळात चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे.