माळरानावर फुलवल्या फळबागा; प्रगतीशील शेतकरी गोपाळ कदम यांचा प्रेरणादायी प्रवास
गोपाळ कदम हे पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या गावचे वारकरी कुटुंबातील शेतकरी. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोपाळ गजानन कदम यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सिताफळाच्या फुलवल्या आहेत. तसेच कारले, कांदा, घेवडा अशा पिकांचे पिकांचीही त्यांनी यशस्वी शेती केली आहे.
पाण्याची खात्रीशीर सोय असल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी 1999 ते 2000 मध्ये विहीर खोदली. जवळपास 6 हजार फूट पीव्हीसी पाईपलाईन करुन नवीन विकसित केलेल्या शेतात पाणी आणले आणि पिकवायला सुरुवात केली.
विहिरीच्या पाण्यामुळे आठमाही शेतीच करता येत होती. मग सहा- सात शेतकऱ्यांचा समुह करुन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून (एनएचएम) सामुहिक शेततळे घेण्याचा निर्णय घेतला.
3 लाख 25 हजार रुपये अनुदानातून 34 मीटर बाय 34 मीटर बाय 4.7 मीटर लांबी, रुंदी, उंचीचे आणि 50 लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे तयार झाले. सर्व पिकांसाठी ठिबक सिंचन तंत्र वापरले जात असल्यामुळे 25 एकर शेतीला या शेततळ्याचे पाणी पुरते. त्यावेळी ठिबक सिंचन संचासाठीही 49 हजार रुपये अनुदानाचा लाभही मिळाला.
गरजेच्या कालावधीतील पाण्याची शाश्वत सोय झाल्यामुळं डाळींब आणि सिताफळ या फळबाग लागवडीवर विशेष भर दिला. 2016 च्या दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिताफळ लागवडीसाठी 20 हजार रुपये अनुदान मंजूर झाले. त्यातून 225 सिताफळ झाडे लावली. पूर्वीची डाळींबाची झाडे जुनी झाल्यामुळे काढून टाकावी लागली. त्यानंतर पुन्हा 2017- 18 मध्ये 450 झाडे लावली. व परत 2021 मध्ये 150 झाडे लावली.
फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी गोपाळ कदम हे जैविक पद्धतीचा अवलंब करतात. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत अत्यल्प ठेवले आहे.
गायीचे शेण, मूत्र, गूळ, दाळीच्या पीठापासून केलेले जीवामृत फवारणे, नीम अर्कची फवारणी. कंपोस्ट तयार करण्यासाठी शेणखत, लेंडीखत, कोंबडखत, बोनमील, उसाची प्रेसमडचा शेतातच डेपो करुन त्यावर नत्र, स्फुरद, पालाश स्थिरीकरणासाठी पीएसबी, एनपीके जीवाणू सोडले जातात. ही खते प्रत्येक झाडाला देऊन कीड, बुरशी नियंत्रणासाठी जीवाणूयुक्त कीडनाशके, बुरशीनाशके वापरतात.
डाळिंबाच्या साडेचारशे झाडांवर पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला 15 किलो माल मिळाला. पुण्याच्या गुलटेकडी फळबाजारात 80 ते 180 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 8 ते साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाले. त्यानंतर आता या झाडांचा तिसरा बहार आणि नवीन लावलेल्या 150 झाडांचा पहिला बहार घेतला आहे.
यावर्षी फळांचा आकार मोठा राहावा म्हणून प्रतिझाड फळांची संख्या नियंत्रणात ठेवली आहे. एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या फुले पुरंदर या वाणाच्या सीताफळाच्या 225 झाडांपासून 5 व्या वर्षी 3 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका झाडावर खतासह एकूण सर्व खर्च 300 रुपयांपर्यंत तर उत्पन्न दीड ते पावणेदोन हजार रुपये मिळाले. त्यांनी एक एकर क्षेत्रावर कारल्याचे पीक घेतले आहे.