Bail Pola 2022 : महाराष्ट्रात ठिकठिकाणी बैलपोळा उत्साहात साजरा
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या नागदरा गावात पोळा हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी गावातील सर्वच बैल सजविण्यात आले. सजविलेल्या बैलांना वाजत-गाजत गावातील महादेवाच्या मंदिरासमोर एकत्र आणण्यात आले. त्या ठिकाणी बैलांटं सामूहिक पूजन करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. गेल्या 12 वर्षांपासून ही परंपरा चालत असल्याने या ठिकाणच्या बैलांनी स्वत:हूनच मंदिराला प्रदक्षिणा घातली. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील लोक हा बैलपोळा बघायला नागदरा या गावी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आज हिंगोली जिल्ह्यातही हा बैल पोळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रत्येक गावात शेतकरी बांधवांनी स्वतःच्या बैलांसोबत हा सण साजरा केला. गावातील देवी देवतेला शेतकऱ्यांनी बैलांबरोबर प्रदक्षिणा घालून पुढील वर्षी शेतात चांगले उत्पन्न निघू देत अशी प्रार्थना केली. बैलांना साजशृंगार करून हा बैलपोळा साजरा करण्यात आला.
वैजापुर तालुक्यातील तलवाडा (नागवाडी) येथे लकी ड्रॉ पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. बऱ्याचदा पोळा सणाच्या मानापानावरुन वाद होतात. पोळ्याचा मान हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा या हेतूने प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यावेळी लहान मुलाच्या हस्ते बाबासाहेब तातेराव मगर या शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी निघाली.