मुूंबई: IIFL Wealth Hurun India ने जाहीर केलेल्या 40 वर्षाखालील सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी असलेल्या झेरोधाचे संस्थापक नितिन कामथ आणि निखिल कामथ या कामत बंधूंचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती ही 24 हजार करोड इतकी आहे.
The IIFL Wealth Hurun India तर्फे दरवर्षी भारतातील 40 वर्षाखालील स्वत:च्या हिंमतीवर अब्जाधीश झालेल्या युवा उद्योगपतींची यादी जाहीर केली जाते. यावर्षी या यादीत 1000 करोड रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांचा समावेश आहे.
कामत बंधूनी 2010 साली झेरोधा या भारताच्या पहिल्या स्टॉक ब्रोकरेज कंपनीची स्थापना केली. दहा वर्षाच्या कालावधीत त्यांची ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी बनली.
झेरोधा कंपनीतर्फे इक्विटी, बॉंडस्, करंसी, कमोडिटी आणि म्युच्युअल फंडचे व्यवहार केले जातात. यात गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराला 330 रूपये गुंतवून अकाउंट काढावे लागते. यातील इक्विटी गुंतवणूक मोफत आहे. या कंपनीत प्रत्येक महिन्याला जवळपास 2 लाख अकाउंट काढले जातात.
या यादीतील इतर अब्जाधीश
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Media.net चे मालक दिव्यांक तुकखिया हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 14,000 करोड इतकी आहे तर तिसऱ्या क्रमांकावर उडान या कंपनीचे मालक अमोद मालवीय यांचे नाव आहे. त्यांची संपत्ती 13.1 हजार करोड इतकी आहे. बायजू या ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या अपचे मालक रिजू रविंद्रन यांनी त्यांच्या 7800 करोड संपत्तीसह या यादीत सहावे स्थान पटकावले आहे.
या यादीत फ्लिपकार्ट च्या बिन्नी बंसल यांचे नावही सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती ही 7,500 हजार करोड इतकी आहे तसेच त्यांचे भागिदार असणाऱ्या फ्लिपकार्टच्या सचिन बंसल यांचीही तितकीच संपत्ती आहे.
2019 सालच्या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश ठरलेले ओयोचे संस्थापक रितेश अगरवाल हे आता या वर्षीच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 3000 करोडने घटून 4500 करोड इतकी झाली. त्यांच्या संपत्तीत एकूण 40 टक्क्यांची घट झाली आहे.कोरोनाचा फटका त्यांच्या व्यवसायाला झाला असल्याचे स्पष्ट दिसते.