सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोलापुरातही मुसळधार पावसाचा परिणाम विद्यापीठांच्या परीक्षेवर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 14 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळही सुरुच आहे. सकाळी 11 वाजताचा ऑफलाईन परीक्षाचा पेपर विद्यार्थ्यांना 1 वाजेनंतरही मिळाला नव्हता.  सकाळपासून सर्व्हर डाऊन झाला असून लॉगिन होत नसल्याचं कारण देण्यात आलं आहे.


अतिवृष्टी आणि खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाईन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे 19 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होतील, असं सोलापूर विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.


लॉकडाऊनमुळे विद्यार्थांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना वेबसाईटवर लॉग इन करताच येत नसल्याची तक्रारी समोर येत होत्या. मुसळधार पावसामुळे इंटरनेट कनेक्शन, वीज नसल्याच्या तक्रारीही येत होत्या. विद्यापीठातर्फे व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न झाले मात्र ते शक्य होऊ न शकल्याने परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.


सोलापूरात आज सकाळी 8.30 पासून दुपारी 2.30 पर्यंत 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.