यवतमाळ: जिल्ह्यात दिवसागणिक हत्येच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी एकाच दिवशी राळेगावच्या कलमनेर आणि कळंब या ठिकाणी दोन हत्येच्या घटना घडल्या आहे. कळंब येथील तरुणाच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज नागपूर-तुळजापूर हा मार्ग दोन तासापेक्षा जास्त वेळ रोखून धरला होता. जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा संतापच नागरिकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला.


शहरालगतच असलेल्या चौसाळा टेकडीवरती अवैध धंद्यातील गुन्हेगार हे देशी कट्टा चालवण्याचा सराव करत असल्याचंही वास्तव समोर आलं आहे. तर जिल्ह्यात मधल्या काळात वाढलेली संघटित गुन्हेगारी, जिल्ह्यातील अवैध रेती तस्करी यामुळे पुन्हा गुन्हेगारी टोळीही उदयास येत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याने याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. 


सोमवारी कळंब येथील अश्विन राऊत याच्यावर हातोडा आणि चाकूच्या वार करुन पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली. तर तर राळेगाव येथील अशोक अक्कलवार हे कळमनरीतील शेतात जागलीला गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यावर वरवंटा घालून ठार केले. जिल्ह्यात एकामागून एक घडत असलेल्या या गुन्ह्याच्या घटनांमुळे जिल्हा हादरून गेला आहे. 


जिल्ह्यात मागील वर्षभरात 74 खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून या 16 दिवसांत 10 खून झाले आहे. या सर्व घटनामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले. पती-पत्नीतील वाद, मालमत्तेचा वाद तर कुठे अवैध व्यवसायातील वर्चस्वाची लढाई अशा प्रकारच्या कारणांनी या घटना घडल्या. त्याचप्रमाणे अवैध धंदे, सावकाराची वसुली, रेती तस्कर यांनी त्यांच्या अवैध धंद्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर सुरू केला आहे. या अल्पवयीन मुलांच्या हाती चाकू-सुऱ्याऐवजी देशी कट्टे आले आहेत. या सर्व बाबीचा विचार केला तर जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य बिगडत चालले आहे हे स्पष्ट आहे. 


ही बातमी वाचा: