Uddhav Thackarey: आपल्या विदर्भातील दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजप, संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच या भाजपच्या या घाणेरड्या राजकारणामुळे लाचारांचा महाराष्ट्र कधीही होऊ देणार नसल्याचं ते म्हणाले.


उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून केली आहे. तसेच त्यांनी रविवारी (9 जुलै) रोजी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता तरी निवडणूक आयोगाचे डोळे उघडलेले असतील'


'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही' 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'हे सध्या गद्दारांचं, लाचारांचं सरकार आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्राची ओळख गद्दारांचा महाराष्ट्र होऊन देणार नाही.' तसेच आता राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


'पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार'


'अमित शाह यांच्यासोबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, पण आता ते नाही म्हणत आहेत.' पण नंतर त्यांनी ही गोष्टच नाकारली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. 


एक देश, एक पक्ष आम्हाला मान्य नाही - उद्धव ठाकरे


समान नागरी कायद्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, 'आमचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे पण आधी तो लोकांना समजावून सांगा.' एक देश एक कायदा चालेल पण एक देश एक पक्ष होऊ देणार नाही असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 


'दमदार शिवसैनिक माझ्या पाठिशी'


आमदार, खासदार गेले तरी माझे दमदार शिवसैनिक आमच्या पाठिशी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच आता खोक्यातून सरकार तयार होत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी भ्रष्ट म्हटलं होतं आता त्याच पक्षाच्या नेत्यांबरोबर पंतप्रधानांचा फोटो आहे. '


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकाराला त्रिशूळाची उपमा दिली होती. त्यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, 'आमच्या तिघांचं सरकार होतं तर ते तीनचाकी सरकार होतं आणि यांच्या तिघांचं सरकार आलं तर ते त्रिशूळ झालं. '


'फडणवीसांची अवस्था एक फुल दोन हाफ'


देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र डागलं. 'देवेंद्र फडणवीस यांची अवस्था एक फुल दोन हाफ अशी झाली आहे', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मी घरात बसून जनतेचा आशीर्वाद मिळाला, यांना दारोदार फिरुनही आशिर्वाद मिळत नाही.' तर भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यावरच शुद्ध कसे होतात असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 


हे ही वाचा : 


Shivsena: शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी