Yavatmal Local News Updates : यवतमाळमधील जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात उघड्यावर गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली असून सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर गर्भवती महिलेची प्रसूती झाल्याची खळबळजनक घटना उकडकीस आली आहे. स्त्रीरोग विभागातील वार्ड क्रमांक 3 मध्ये दाखल झालेल्या पारधी समाजाच्या महिलेला सकाळी चक्क हाकलून दिल्याचा आरोप होत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावीही निघून गेली. प्रतीक्षा सचिन पवार रा.बाळेगाव झोंबाडी ता.नेर असे महिलेचे नाव आहे. मात्र, ही महिला वॉर्ड क्रमांक 3 मधून खाली आलीच कशी? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याला रुग्णालयात प्रशासनाचा बेजबदारपणा कारनीभूत असल्याचे दिसून येते आहे.
प्रतीक्षाची पतीसह 108 रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये पोहोचली. तिला वार्ड क्र.3मध्ये दाखल करून घेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी आणण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. रक्ताची पिशवी घेऊन तो पहाटे 4.30 वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावण्यात आले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलून देण्यात आले. रक्ताची पिशवीही त्यांच्या अंगावर भिरकावली. पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातीलच मैदानात थांबला. चहा-पाणी घेत असतानाच, सकाळी साडेआठ वाजता प्रतीक्षाने उघड्यावर बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांच्या संपर्क साधला असता या महिलेची प्रसूती ही रुग्णालयाच्या परिसरात झाली असून ही बाब खरी आहे. मात्र, तिला कुणीही हाकलून लावले नाही तर ती स्वतः पतीसह निघून गेली. प्रसूती नंतर तिला पुन्हा रुग्णालयात आणले मात्र ती थांबण्यास तयार नसल्याचे सांगितले. तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले. संबंधित महिलेच्या पतीने खाजगी रक्तपेढीतून रक्त का व कसे आणले? याची चौकशी केली जाईल त्यावर कारवाई केली जाणार आहे, असेही डॉ सुरेंद्र भुयार यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात ही महिला वॉर्डातून खाली का आली? कशी आली ? त्या ठिकाणी कर्मचारी हजर नव्हते का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.