Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकरावर सभामंडप उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जात आहे. 


अशी तयारी करण्यात आली...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी केली जात होती. या सभेच्या अनुषंगाने सकाळी 7 वाजता पासून तर रात्री उशिरापर्यंत 500 पेक्षा अधिक मजूर सभामंडप उभारणीचे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातील आग्रा, राजस्थान, हैदराबाद आदी राज्यातील शेकडो मजूर गेल्या तीन काम करतांना पाहायला मिळाले. सभेच्या तयारीसाठी वेगवेगळ्या 30 समित्या गठित करण्यात आल्या होत्या. ज्यात सर्वांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे अनेक मंत्री आणि नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 7 हेलिपॅडची निर्मिती जवळच असलेल्या विमानतळावर करण्यात आली असून, विशेष रस्ता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी तयार करण्यात आला आहे.


साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (28 फेब्रुवारी)  यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदींच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी आहे. अमरावती परीक्षेत्रासह इतर जिल्ह्यातीलही पोलीस या बंदोबस्तात आहे. एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी यांचे पथक आहे. येणाऱ्या सर्व महिलांची तपासणी करूनच आत सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


'या' नेत्यांची उपस्थिती...


यवतमाळ येथे होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


PM Modi : 'अनेक दशकांपासून रेल्वेला स्वार्थी राजकारणाचं बळी व्हावं लागलं' पंतप्रधानांकडून खंत व्यक्त, रेल्वे प्रकल्प उद्घाटन प्रसंगी आणखी काय म्हणाले?