Amit Shah : आज संसदेत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी यवतमाळच्या कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) या शेतकरी विधवा महिलेला काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात जे व्यक्तव केलं त्यावरून कलावती पुन्हा चर्चेत आल्या. आपल्याला अडचणीच्या काळात कोणी मदत केली, याबाबत कलावती यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना स्पष्ट सांगितले.
आज लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शाह यांनी काँग्रेसने कलावतींचा फक्त राजकीय वापर केला असल्याचा आरोप केला. कलावती यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर 2008 मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कलावती यांची भेट घेतली होती. राहुल गांधी हे कलावती यांच्या घरी जेवायला गेले होते आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली गेली नाही, असा आरोप अमित शाह यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कलावतीला सर्व काही पुरवल्याचा दावा अमित शहा यांनी केला.
अमित शाह यांनी केलेल्या दाव्यामुळे कलावती पुन्हा एकदा चर्चेत आल्या. अमित शाह यांनी केलेल्या दाव्याबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी कलावती यांनी भाजपने मदत केली नसल्याचे स्पष्ट केले. कलावती यांनी सांगितले की, मला भाजप सरकारने कुठलीच मदत आजपर्यंत केली नाही. माझ्या घरी 2008 मध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आले. त्यानंतर घरी वीज नळ जोडणी, रेशन कार्ड, घरकुल आणि 30 लाखांची मुदत ठेव करून देण्यात आली. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीवर अजूनही घर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारकडून आपल्याला कुठलीच मदत मिळाली नसल्याचेही कलावती यांनी सांगितले.
अमित शाह यांनी काय म्हटले?
अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, 'एक नेता एका गरीब आई कलावतीच्या घरी जेवणासाठी गेला होता. इथे मागे बसून त्यांनी गरिबीचे तपशीलवार वर्णन केले. नंतर त्यांचे सरकार 6 वर्षे टिकले, मला विचारायचे आहे की त्या कलावतीचे काय केले? कलावतींना घर, वीज, गॅस, शौचालय, धान्य, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. त्या आजही मोदींच्या सोबत आहेत.
कलावती कोण आहेत?
कलावती यांचे पती परशुराम यांनी कर्ज फेडण्याच्या दबावाखाली आत्महत्या केली होती. या भेटीनंतर कलावती प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. कलावती या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्या राहुल गांधी यांना 14 वर्षांनी भेटल्या होत्या.