Yavatmal News : देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Independence Day) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. परंतु यवतमाळमधील (Yavatmal) येडशी गावातील विद्यार्थ्यांवर शाळेऐवजी नाल्यावरच झेंडा फडवण्याची वेळ आली. पुलाअभावी नाला बंद असल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने नाल्यावरच झेंडा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावा लागला.


यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील येडशी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी मुकुटबन इथे जातात. येडशी हे गाव मुकुटबन गावापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. ऑटोरिक्षाच्या माध्यमातून 80 ते 90 लहान विद्यार्थी मुकुटबन इथे जातात. मात्र येडशी इथला नाला बंद असल्याने नाईलाजाने विद्यार्थ्यांनी नाल्यावरच झेंडा फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन नाल्यावरच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.


भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झाली. मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून येडशी हे गाव खूप मागे आहे. जेव्हा निवडणूका येतात तेव्हा फक्त गावात आश्वासन द्यायचं आणि वेळ आली की ढुंकून सुद्धा पाहायचे नाही, असं या भागात वारंवार घडत आहे.


यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही हा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यादिनाला शाळेत जाऊन ध्वजारोहण करणं, राष्ट्रगीत गाणं, तसंच इतर कार्यक्रमात सहभागी होणं यासाठी विद्यार्थी उत्सुक होते. परंतु त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं. परंतु या विद्यार्थ्यांनी गुडघाभर पाण्यात जाऊन जय हिंद आणि वंदे मातरम् असे नारे नाल्यावरच दिले. तिथेच राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. 


यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. पूल वाहून गेले आहेत. त्यातच येडशी गावाला जायचं म्हटले की दोन ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. ऑटोरिक्षामधून जायचं म्हटलं तरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावामध्ये बसची सुविधा नाही, स्मशानभूमी नाही. गावात बऱ्याच समस्या आहेत. तरी देखील प्रशासन सुस्त झोपेचं सोंग घेऊन असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 


आता प्रशासन या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देईल का असा देखील प्रश्न या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार खासदार साहेबांनी जातीने लक्ष देऊन हा पूल नव्याने बनवण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहे. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांचा विचार करुन पूल मोठा बांधण्यात यावा अशी मागणी होत आहे.