Bhavana Gawali : माझी उमेदवारी कापण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली ही हेमंत पाटलांनी (Hemant Patil) जाहीर केलेच आहे, असं म्हणत संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर भावना गवळी यांनी रोष व्यक्त केला. तर माझे काही भाऊ मागील काळातही भावना गवळीला (Bhavana Gawali) उमेदवारी देऊ नका म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गेले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. मात्र येणाऱ्या विधानसभेत आपण ताकद दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होत्या.


भावना गवळी म्हणाल्या की, मीडिया मला विचारते तुमच्या झाशीचं काय झालं? याबाबत हेमंत पाटील यांनी सांगितलं, याची स्क्रिप्ट कोणी लिहिली कसं कसं काय झालं, हे त्यांनी आधी सांगितलं आहे. खासदारकी जरी मिळाली असली तरीही टिकवताना खूप संघर्ष केला आहे.


फडणवीस-ठाकरेंकडे मागील काळात माझ्याबाबत तक्रारी केल्या, मात्र...


मागच्या काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे माझ्या काही भावांनी माझ्या तक्रारी केल्या आणि यांना उमेदवारी देऊ नका असं सांगितलं. मात्र तरीही मला उमेदवारी मिळाली आणि माझा जुना रेकॉर्ड मोडत मी मोठ्या बहुमताने विजयी झाले. 


माझी उमेदवारी कापण्याचं कारण माझ्या नेत्यालाच कळलं नाही


शिवसेनेचा सिम्बॉल हा वाघाचा आहे. वाघाला मोठी झेप घ्यायचे असेल तर दोन पावलं मागे घ्यावं लागतं. पुढच्या काळात एकनाथ शिंदे मोठी झेप घेतील. माझी उमेदवारी कापण्याचं कारण सांगा म्हणून लोक मला विचारतात. मात्र याचं कारण माझ्या नेत्यालाच कळलं नाही तर भावना गवळीला काय कळेल? असे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


विधानसभेत ताकद दाखवणार


हेमंत पाटील यांना इकडे का आणले हे त्यांनाही माहित नाही. तुम्हा आम्हा सर्वांना हे कोडंच आहे. शेवटच्या संघर्षामध्ये मला कुठेतरी थांबायचं काम पडलं. परंतु माझ्या मनामध्ये खंत होती ती मी बोलून दाखवली. मी 25 वर्ष शिवसेनेसाठी लावले आहेत. त्याचा मोबदला मला निश्चित मिळेल. नेते माझ्या विरोधात थोडेफार असू शकतात. मात्र सर्वसामान्य जनता माझ्या विरोधात कधीच नाही. हे मी मोदींच्या गॅरंटीसह भावना गवळीच्या गॅरंटीने सांगते. एक झाशी माझी गेली असेल मात्र माझ्यामध्ये क्षमता आहे. विधानसभेमध्ये शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला विश्वासात घेऊन उमेदवार देणार आहेत. त्यावेळी आपण आपली ताकद दाखऊ, असे भावना गवळी यांनी सांगितले. 


आणखी वाचा 


Eknath Shinde: भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही; यवतमाळच्या सभेत एकनाथ शिंदेंची गॅरंटी